‘देवनार’मध्ये दुसरा वीज प्रकल्प,पालिकेचा निर्णय; आंतरराष्ट्रीय स्तरावर मागवल्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 07:10 AM2021-01-26T07:10:04+5:302021-01-26T07:10:24+5:30
१९२७ पासून १३२ हेक्टर परिसरात असलेल्या देवनार कचराभूमीवर कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी आता ११४ फुटांचे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत.
मुंबई : देवनार कचराभूमीवरवीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प अद्याप वेग घेण्याआधी महापालिकेने दुसऱ्या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. या नव्या प्रकल्पाअंतर्गत दररोज १,२०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या आहेत.
मुंबईतील कचऱ्याचा भार पेलणाऱ्या देवनार कचराभूमीची मर्यादाही आता संपुष्टात आली आहे. त्यानुसार कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने सुरू केली आहे, तर कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय पालिकेने सात वर्षांपूर्वी घेतला. मात्र, एकाच वेळी तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सहाशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या; परंतु तीन वेळा निविदा मागविल्यानंतर मे २०१९ मध्ये ठेकेदार पुढे आले. त्यातून एका ठेकेदाराची निवड करून गेल्या वर्षी कार्यादेश देण्यात आले. त्यानंतर आता १२०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी २२ फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांना अभिरुची स्वारस्य दाखल करता येणार आहे.
१९२७ पासून १३२ हेक्टर परिसरात असलेल्या देवनार कचराभूमीवर कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी आता ११४ फुटांचे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. पहिल्या प्रकल्पात ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून प्रतिदिन चार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका १०५६ कोटी खर्च करणार आहे. नव्या प्रकल्पात १२०० ते १८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २४ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता असणार आहे. यासाठी १०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जाणारा हा प्रकल्प २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.