मुंबई : दुसरी खासगी तत्त्वारील तेजस एक्स्प्रेस जानेवारी २०२० मध्ये धावणार आहे. तेजस एक्स्प्रेसचे तिकीट दर हे इतर एक्स्प्रेसच्या तुलनेने जास्त असतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ती मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
आॅक्टोबर २०१९ मध्ये देशातील पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ या मार्गावर धावली. त्यानंतर खासगी एक्स्प्रेस चालविण्यासाठी दुसरा मार्ग म्हणून मुंबई ते अहमदाबाद मार्ग निवडण्यात आला. या मार्गावर १७ जानेवारी रोजी तेजस एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)च्या वतीने या दोन्ही खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येतील.
मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची पहिली ट्रेन सकाळी ६.४० वाजता अहमदाबादहून सुटेल. ती दुपारी १.१० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. तर, मुंबई सेंट्रलहून दुपारी ३.४० वाजता सुटेल. ती अहमदाबाद येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचेल. आठवड्यातील गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्स्प्रेस धावेल. तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाºया एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा अल्पदरात उपलब्ध आहेत. ज्येष्ठ, विद्यार्थी, रुग्णांसाठी तिकीट दरात सवलत मिळते. मात्र खासगी एक्स्प्रेसमध्ये अशा सुविधा नाहीत. याचे भाडे जास्त असल्याने प्रवास सामान्यांच्या खिशाला परवडणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करता तेजस एक्स्प्रेसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येईल का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.