मुंबई विद्यापीठाचे दुसरे सत्र १ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:05 AM2020-12-26T04:05:18+5:302020-12-26T04:05:18+5:30
वर्ग ऑनलाइन : शैक्षणिक वेळापत्रक जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार नुकतेच ...
वर्ग ऑनलाइन : शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार नुकतेच शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केले. त्यानुसार, विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू हाेईल. दुसऱ्या सत्रातही वर्ग ऑनलाइनच भरतील. दुसरे सत्र १ जानेवारी ते ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे.
आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठाने उपकेंद्रांसाठीही वेळापत्रक जाहीर केले. यात ठाणे उपकेंद्रातील बीएमएस आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. मात्र, या वेळापत्रकाच्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार ९० दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होणार नसल्याची टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
वेळापत्रकानुसार उन्हाळी सुटी फक्त १३ दिवसांची असल्यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. इंजिनीअरिंग, एमबीए, विधी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप पूर्ण झाले नसल्याने प्रथम वर्षासाठी विद्यापीठ स्वतंत्रपणे पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार का, असा प्रश्न प्राध्यापकांनी उपस्थित केला.
*असे आहे वेळापत्रक
पहिले सत्र - ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२०
दुसरे सत्र - १ जानेवारी ते ३१ मे २०२१
उन्हाळी सुटी - १ जून ते १३ जून २०२१
-----------------