* १०० कोटी वसुलीचे टार्गेट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी चौकशी करीत असलेल्या निवृत्त न्या. चांदीवाल समितीने मुख्य सूत्रधार सचिन वाझे याला शपथपत्र देण्यासाठी दुसऱ्यांदा समन्स जारी केले. एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेने पहिल्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले होते. सीआययूचा तत्कालीन प्रभारी एपीआय वाझेला मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा ‘लेटरबॉम्ब’ टाकला होता.
राज्य सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्या. चांदीवाल यांची नियुक्ती केली. समितीने ३० मे रोजी संबधित पाच जणांना समन्स बजावून, या आरोपांच्या अनुषंगाने ११ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र वाझे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचे प्रतिज्ञापत्र अद्याप सादर झालेले नाही. त्यामुळे आयोगाने वाझेला पुन्हा दुसरे समन्स बजावले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज यापूर्वीच सादर केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील गाडीत आढळलेल्या स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाझेला मार्चमध्ये एनआयएने अटक केली आहे.