मुंबई ते अहमदाबाद धावणार दुसरी ‘वंदे भारत’? प्रस्ताव दिल्लीला पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 06:20 AM2023-08-20T06:20:21+5:302023-08-20T06:20:30+5:30
देशातील सर्वांत व्यस्त कॉरिडॉरपैकी मुंबई ते अहमदाबाद मार्ग ओळखला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प. रेल्वेची पहिली मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये तुफान हिट झाली. या वंदे भारत ट्रेनच्या एकूण आसनक्षमतेच्या १३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आता मुंबई ते अहमदाबाद मार्गावरही दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.
देशातील सर्वांत व्यस्त कॉरिडॉरपैकी मुंबई ते अहमदाबाद मार्ग ओळखला जातो. येथे दररोज सरासरी ३० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सध्या या मार्गावर जवळपास दोन डझन रेल्वेगाड्या असून बहुतांश गाड्या हाऊसफुल्ल असतात. मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्याने शताब्दी एक्स्प्रेसवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पूर्वी व्यक्त केली होती. मात्र, तसा परिणाम दिसून आलेला नाही. तसेच मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, विविध सुपरफास्ट व एक्स्प्रेस गाड्यांवर प्रवाशांच्या गर्दीचा ताण वाढत जात आहे.
प्रस्ताव दिल्लीला पाठविणार
प. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. मुंबई ते अहमदाबाद दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याबद्दल मागणीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.