दुसऱ्या लाटेत मुंबई, दिल्ली विमानतळावरून १४० हवाई रुग्णवाहिकांनी केली ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:28+5:302021-06-16T04:08:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एप्रिल आणि मेदरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे गंभीर प्रकृतीच्या रुग्णांची संख्या वाढली. अशावेळी अत्यवस्थ ...

In the second wave, 140 air ambulances came and went from Mumbai, Delhi airport | दुसऱ्या लाटेत मुंबई, दिल्ली विमानतळावरून १४० हवाई रुग्णवाहिकांनी केली ये-जा

दुसऱ्या लाटेत मुंबई, दिल्ली विमानतळावरून १४० हवाई रुग्णवाहिकांनी केली ये-जा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एप्रिल आणि मेदरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे गंभीर प्रकृतीच्या रुग्णांची संख्या वाढली. अशावेळी अत्यवस्थ रुग्णांना जलदगतीने मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी हवाई रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावली. या दोन महिन्यांत मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून एकूण १४० हवाई रुग्णवाहिकांनी ये-जा केल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक रुग्ण वाहतूक ही दिल्लीतून झाली. १ एप्रिल ते २० मेदरम्यान दिल्ली विमानतळावरून जवळपास ९६ हवाई रुग्णवाहिकांनी ये-जा केली. म्हणजेच प्रतिदिन सरासरी दोन रुग्णांना सेवा देण्यात आली. दुसरीकडे मुंबई विमानतळावर या दोन महिन्यांत ४४ एअर ॲम्ब्युलन्सची नोंद झाली.

हवाई रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागणाऱ्या रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असते. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी हवाई रुग्णवाहिकांच्या आगमन आणि प्रस्थानासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार रुग्णवाहिका मार्गस्थ होणार असल्याची सूचना मिळाल्यानंतर संबंधितांना त्याबाबत कळवून विनाअडथळा आणि जलद विमान प्रचलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना सतत प्राणवायूची आवश्यकता भासत असल्याने हवाई रुग्णवाहिकेत पुरेसा प्राणवायूचा साठा उपलब्ध असणे गरजेचे असते. रुग्णामुळे इतरांना या विषाणूची लागण होऊ नये यासाठी आयसोलेशन पॉडची व्यवस्था करावी लागते. शिवाय सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उड्डाणादरम्यान गंभीर रुग्णांची काळजी घेण्यास सक्षम असलेल्या सर्टिफाइड डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांनाच हवाई रुग्णवाहिकेत सेवा देण्यास परवानगी आहे. या सर्व निकषांचे पालन करणाऱ्याच एअर ॲम्ब्युलन्सनाच परवानगी दिली, अशी माहितीही देण्यात आली.

* भाडे किती आकारले जाते?

भारतात ४५ ते ५० मिनिटांच्या प्रवासासाठी हवाई रुग्णवाहिकांचे दर हे ७५ हजारांच्या आसपास आहेत; परंतु कोरोनाकाळात मागणी वाढल्याने दर १ ते दीड लाखापर्यंत वाढले आहेत. एअर ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या कंपन्या मोठ्या रुग्णालयांशी आधीच करारबद्ध असतात. त्यामुळे विमानतळावर लँडिंग केल्यानंतर रुग्णाला जलदगतीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत केली जाते. अशा सुविधा मिळत असल्याने रुग्णाचे नातेवाईकही जादा पैसे मोजण्यास तयार होतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

..................................

Web Title: In the second wave, 140 air ambulances came and went from Mumbai, Delhi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.