लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पोलीस दलावर संकट कायम आहे. अशात, आतापर्यंत मुंबईत ९ हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात, कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे.
राज्य पोलीस दलात आतापर्यंत ४२ हजार १०६ पोलीस बाधित झाले. त्यापैकी ३८ हजार २८६ जणांनी कोरोनावर मात केली. ४३२ जणांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ३८८ जण सध्या उपचार घेत आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यात १२०३ पोलीस बाधित झाले आहेत, तर मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ९ हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. ८ हजारांच्या आसपास पोलीस कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर परतले. त्यापैकी ११२ हून अधिक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांच्यावर संकट कायम आहे.
* पाचही विभागांमध्ये उपचार केंद्रे सुरू होणार
पोलिसांसाठी कलिना येथे सुमारे २५० खाटांचे उपचार केंद्र सुरू आहे. गोरेगाव येथे आलिशान हॉटेलमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्वॉरंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांची गैरसोय होऊ नये म्हणून शहराच्या पाच प्रादेशिक विभागांत स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. पाचही विभागांमध्ये खासगी, शासकीय इमारती उपचार केंद्रांसाठी निवडण्यात आल्या आहेत. केंद्रांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे.
.....
मुंबई पोलीस दलात ७५ टक्के पोलिसांनी घेतली लस
मुंबई पोलीस दलात ७५ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५० टक्के पोलिसांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
.....
दोन्ही डोस घेऊनही मृत्यू
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यातील अंमलदार संदीप तावडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांनी दुसरी लस मार्चमध्ये घेतली होती.
......
फिटनेसवर भर
कोरोनाच्या काळात पोलीस फिटनेसवर भर देत आहेत. तसेच छंद जोपासत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
....