Join us

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लावला विमान उड्डाणांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:05 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसांच्या मुक्त संचाराबरोबरच विमान उड्डाणांनाही ब्रेक लावला. मार्चच्या तुलनेत मे महिन्यात मुंबई विमानतळावरील उड्डाण ...

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसांच्या मुक्त संचाराबरोबरच विमान उड्डाणांनाही ब्रेक लावला. मार्चच्या तुलनेत मे महिन्यात मुंबई विमानतळावरील उड्डाण संख्येत तब्बल ५८ टक्के घट नोंदविण्यात आली असून, या काळात केवळ ७ हजार विमानांनी ये-जा केल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वांत व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबई विमानतळावरून कोरोनापूर्वकाळात दररोज सरासरी ९८० विमाने आकाशात झेपावायची. मात्र, कोरोनामुळे प्रवासी घटल्याने उड्डाणसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. पहिल्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर जानेवारीपासून प्रवासी संख्या वाढून विमान उड्डाणे पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले. जानेवारी महिन्यात १६ हजार ४३१, फेब्रुवारीत १५ हजार ६८९, तर मार्चमध्ये मुंबईहून तब्बल १७ हजार ४६ विमानांनी गगनभरारी घेतली. परंतु, एप्रिलपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने उड्डाणसंख्येचा आलेख घसरणीला लागला.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालानुसार, मुंबई विमानतळावर एप्रिल महिन्यात १३ हजार ७६३, तर मे महिन्यात सर्वांत कमी ७ हजार १४७ उड्डाणसंख्या नोंदविण्यात आली. देशभरातील विमानतळांचा विचार करता मार्चमध्ये १ लाख ६८ हजार ४७२, एप्रिल १ लाख ४३ हजार ९८४ आणि मे महिन्यात केवळ ७४ हजार ७२७ विमाने आकाशात झेपावली.

नागरी उड्डाण संचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ जुलैपर्यंत वाढविले आहेत. शिवाय युरोपियन राष्ट्रे, संयुक्त अरब अमिरातीसह काही महत्त्वाच्या देशांनी भारतीय प्रवाशांवरील निर्बंध अद्याप शिथिल केले नसल्याने मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या दोन ते तीन हजारांवर स्थिरावली आहे. त्यात दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे विविध राज्यांनी कठोर निर्बंध लागू केल्याने देशांतर्गत प्रवासी संख्येवरही परिणाम झाल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबई विमानतळावरील उड्डाण संख्या

महिना..... आंतरराष्ट्रीय... देशांतर्गत..... एकूण

जानेवारी...... २,६४२........ १३,७८९...... १६,४३१

फेब्रुवारी..... २,३९४....... १३,२९५.... १५,६८९

मार्च..... २,७२३...... १४,३२३....... १७,०४६

एप्रिल...... २,३७७...... ११,३८६...... १३,७६३

मे.... १,९६९...... ५,१७८....... ७,१४७