'कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारतेय, जिल्हाधिकाऱ्यांना मी आदेश दिलेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 07:31 PM2021-02-21T19:31:40+5:302021-02-21T19:34:35+5:30
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला.
मुंबई - देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. (increase in coronavirus patients in Maharashtra) त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी, वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, कोरोनापासून बचावासाठी शिस्त पाळणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं औषध तेव्हाही नव्हतं, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झालं असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
सुरुवातीच्या काळात कोरोनाची लढाई आपण धीराने लढलो, आपण बेडपासून ते कोविड सेंटरपर्यंत मोठ्या झपाट्याने कम केलंय. पण, मधल्या काळात आपण पुन्हा कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नाही, आपण शिस्तीचं पालन करण्यात ढिलाई केली. तुमच्या मागणीनुसार मंदिरापासून ते लोकलपर्यंत सर्वकाही सुरू केलं. पाश्चिमात्य देशात अजूनही लॉकडाऊन आहे, ब्रिटनमध्ये डिसेंबरपासून लॉकडाऊन आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क थांबवणं हाच उपाय, असल्याच मुख्यमत्र्यांनी सांगितलं. माझे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा रद्द केलाय, त्यांनी दाखवलेली ही तत्परता उल्लेखनीय आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करत मुलासह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करतो, असेही ठाकरे म्हणाले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state https://t.co/aU3H6umKzm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021
कोविड योद्ध्यांचा सन्मान करायलाच हवा, पण त्यांचा सत्कार करताना आपण कोविड दूत होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. अमरावतीमध्ये आज हजारांच्या आसपास रुग्ण सापडले आहेत. आता, कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं तर आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडेल, असा प्रश्न लोकांना केला. सध्या राज्यात 53 हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आज 7 हजार नवीन रुग्ण सापडले आहे. तर, मुंबईतील आकडा 800 ते 900 पर्यंत गेलाय. कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारतेय. त्यामुळे, मी जिल्हाधिकाऱ्यांना बंधन घालण्यासंदर्भात सूचना आणि आदेश दिले आहेत. एकदम लॉकडाऊन नको, पण गरजेनुसार निर्णय घेण्याचं बजावल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं
कोरोना डोकं वर काढतोय
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी वारंवार संवाद साधून मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम केले आहे. मु्ख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सुरुवातीपासूनच जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यामध्येही यश मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यासारख्या शहरात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.