Join us

मुंबईत दुसऱ्या लाटेत दोन महिन्यात अडीच लाख रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत गेल्या दोन महिन्यात २.५ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीपेक्षा ...

मुंबई : मुंबईत गेल्या दोन महिन्यात २.५ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ० ते ४९ वयोगटातील ६४ टक्के रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षी ५६ टक्के एवढे होते. दरम्यान ० ते ४९ या वयोगटातील लोकांच्या मृत्यूंचे प्रमाण ५० ते ९० या वयोगटातील लोकांच्या तुलनेत कमी आहे.

यावर्षी २० फेब्रुवारी ते २० एप्रिल दरम्यान मुंबईत २,५१,३८६ नव्या रुग्णांची नोंद झाली हे त्यापैकी १,६०,६४३ रुग्ण ० ते ४९ वर्षे वयोगटातील आहेत. आकडेवारीनुसार, या दोन महिन्यात मुंबईत ९७१ मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी ९१ टक्के हे ५० ते ९० वयोगटातील आहेत. म्हणजेच ज्येष्ठांच्या मृत्यूंचे प्रमाण अजूनही जास्त आहे. तर, सर्वाधिक सक्रिय सहभाग ३० या वयोगटातील लोकांचा आहे. ही संख्या ५३ हजार ५८८ एवढी आहे. त्यापाठोपाठ ४० ते ९९ वयोगटातील ४५ हजार ५०६ रुग्ण आहेत. आणि २० ते २९ या वयोगटातील ४४ हजार ३७४ एवढे रुग्ण आहेत.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत पहिल्या लाटेत तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. तर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये १० ते १९ वर्षे वयोगटातील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या आकडेवारीनुसार, या दोन महिन्यात १० ते १९ या वयोगटातील १२ हजार ८८९ जणांना संसर्ग झाला आहे. २० फेब्रुवारी पर्यंतच्या आकडेवारी पेक्षा हा आकडा खूपच जास्त आहे. मार्च २०२० मध्ये जेव्हा महामारीला सुरुवात झाली तेव्हा १० ते १९ वर्षे वयोगटातील १२ हजार २२१ मुलांना संसर्ग झाला होता. पहिल्या लाटेत काेराेनाच्या दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडण्यास मुंबईत सात महिने लागले होते. पण आता अवघ्या दोन महिन्यात हा आकडा गाठला आहे.

* तरुणांमध्ये संसर्ग अधिक, तरी मृत्यूचे प्रमाण कमी

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या लाटेमुळे अधिक तरुणांना संसर्ग झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ४५ वर्षांखालील तरुणांना यावेळी अधिक संसर्ग होत आहे. मुख्यतः एकत्र जमल्यामुळे संक्रमणाचा वेगवान प्रसार होतो. काही प्रमाणात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. मात्र त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. काही दिवसांच्या संसर्गानंतर तरुण रुग्णांची लक्षणे तीव्र होऊ शकतात. डबल म्युंटट व्हायरसमुळे रुग्णांच्या क्लिनिकल ट्रेंडमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले आहे. तरुण रूग्ण काही दिवस ठीक असतात. पण अचानक सात ते आठ दिवसानंतर त्यांची लक्षणे वाढतात, असेही डाॅ. सुपे यांनी सांगितले.

..............................