Join us

दुसऱ्या लाटेत तरुण बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले; तज्ज्ञांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 1:55 AM

परळ येथील केईएम रुग्णालयात मागील वर्षी ३५ वर्षांहून कमी वय असलेले १७ टक्के रुग्ण दाखल होत होते. मात्र २०२१ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण २७ टक्क्यांवर आले आहे. याविषयी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, ३५-५५ वयोगटांतील बाधितही रुग्णालयात दाखल होत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील वर्षी कोरोना संसर्ग होऊनही तरुण वयोगटातील बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते, परंतु आता दुसऱ्या लाटेत तरुण बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.परळ येथील केईएम रुग्णालयात मागील वर्षी ३५ वर्षांहून कमी वय असलेले १७ टक्के रुग्ण दाखल होत होते. मात्र २०२१ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण २७ टक्क्यांवर आले आहे. याविषयी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, ३५-५५ वयोगटांतील बाधितही रुग्णालयात दाखल होत आहेत. या वेळच्या लाटेत या गटात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय, हे रुग्ण लक्षणविरहित आहेत.मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक विळखा २० ते २९ वर्षे वयोगटातील ६८,३४५ तरुणांना बसला आहे. त्यापैकी आतापर्यंत १२७ तरुणांना कोरोनामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे. तरुण जास्त घराबाहेर पडत असल्याने त्यांना संसर्ग हाेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तरुणांनी घराबाहेर पडताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.लक्षण दिसल्यानंतर निदान, उपचार प्रक्रियेत येण्यासाठी उशीरराज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, कोरोनाच्या संसर्गाचा कालावधी हा सामान्यतः दोन ते तीन आठवड्यांचा असतो. त्यात तरुणांमध्ये होणारा संसर्ग बऱ्याचदा लक्षणविरहित असतो. लक्षण दिसायला ठरावीक काळ जावा लागतो. त्यामुळे लक्षण दिसल्यानंतर निदान, उपचार या प्रक्रियेत येण्यासाठी उशीर होत असल्याने या गटातील बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.शिवाय, ज्येष्ठ किंवा सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींकडे लसीमुळे काही प्रमाणात सुरक्षितताही आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही वयोगटातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये; तसेच घराबाहेर पडत असल्यास कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस