दुसरी लाट ओसरली तरी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची भारताकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:05 AM2021-07-28T04:05:39+5:302021-07-28T04:05:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांत वाढ होण्याची अपेक्षा हवाई वाहतूक क्षेत्राला होती; परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांत वाढ होण्याची अपेक्षा हवाई वाहतूक क्षेत्राला होती; परंतु ती फोल ठरली आहे. कारण रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतरही परदेशी पाहुण्यांनी भारताकडे पाठ फिरवल्याने मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत केवळ ४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
पहिल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर डिसेंबरपासून परदेशी प्रवाशांच्या ‘भारतवारी’त वाढ झाली. मार्च महिन्यात तर तब्बल १६ लाख १० हजार ४८ आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी देशाच्या विविध विमानतळांवरून ये-जा केली; परंतु एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्याने प्रवासी संख्येचा आलेख पुन्हा घसरणीला लागला. एप्रिलमध्ये १३ लाख ७५ हजार १३, तर मे महिन्यात ही संख्या केवळ ४ लाख ९७ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली. जूनपासून रुग्णसंख्येत घट झाल्याने बऱ्याच देशांनी भारतीय प्रवाशांवरील बंदी उठवली. त्याचप्रमाणे परदेशात नोकरी वा शिक्षणानिमित्त जाणाऱ्यांसाठी लसीकरणाचा कालावधीही कमी करून दिल्याने प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित होती; परंतु या महिन्यात ती ५ लाख १८ हजारांवर स्थिरावली.
‘डीजीसीए’ने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध शिथिल न केल्याचा हा परिणाम असल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. शिवाय भारतात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने त्याची धास्ती घेत अनेकांनी नियोजित प्रवास लांबणीवर टाकला. संयुक्त अरब अमिरातीसारख्या राष्ट्रींनी आजही भारतीयांवरील प्रवासबंदी उठवलेली नाही. आपल्याकडील आंतरराष्ट्रीय प्रवाशांत यूएईमधून ये-जा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या सर्वाचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे.
प्रमुख विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी
विमानतळ एप्रिल मे जून
दिल्ली ४,२१,८१७ १,६५,९२४ १,७७,४३२
मुंबई १,३७,२१३ ५४,१८५ ६१,७१७
कोची १,३८,६२५ ४७,९६९ ५४,७९४
कालिकत १,०१,९४४ ३४,३२१ ३५,४१०
चेन्नई ८९,३८० ३८,४०६ ३३,३२८