‘त्या’ आगीचे रहस्य गुलदस्त्यातच
By admin | Published: November 19, 2014 12:28 AM2014-11-19T00:28:52+5:302014-11-19T00:28:52+5:30
कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी पूर्ण झाली असून परिवहन समितीच्या सभेत यासंदर्भातला चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती केडीएमटी प्रशासनाने दिली होती़
कल्याण : कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी पूर्ण झाली असून परिवहन समितीच्या सभेत यासंदर्भातला चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती केडीएमटी प्रशासनाने दिली होती़ परंतु, सोमवारी झालेल्या सभेत हा अहवाल सादर करण्यात आला नाही. प्रशासनाचा चालढकलपणा आणि परिवहन सदस्यांमध्ये असलेली अनास्था यामुळे चौकशीअंतीही या आगीचे गूढ तूर्तास कायम राहिले आहे.
२०१०-११ मध्ये केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमात टाटा कंपनीच्या ३० बस दाखल झाल्या. यातील एका बसला अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली परिसरात लागलेल्या या भीषण आगीत संपूर्ण बस खाक झाली होती़
ही घटना ३ आॅक्टोबर २०१४ ला घडली होती़ सुदैवाने वाहक आणि चालक यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १३ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. डिसेंबर २०१३ मध्येही अशाच एका बसला आग लागल्याची घटना कल्याण येथील बैलबाजार चौकात घडली होती. ती बसदेखील टाटा कंपनीचीच होती. दरम्यान, ३ आॅक्टोबर ला आग लागल्याची पुनरावृत्ती घडली. या आगीच्या घटनेची चौकशी सल्लागारांमार्फत करण्यात आली असून बस टाटा कंपनीची असल्याने संबंधित कंपनीलादेखील प्रशासनाने पत्र पाठविले होते.
दरम्यान, आगीच्या घटनेची चौकशी पूर्ण झाली असून हा चौकशीचा अहवाल १७ नोव्हेंबरच्या परिवहन समितीच्या सभेत ठेवला जाणार असल्याची माहिती कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली होती. परंतु, सोमवारच्या सभेत कदम यांनी पुढील सभेत अहवाल ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
परिवहन सदस्य आरीफ पठाण यांनी उपक्रमाच्या बसेस वारंवार दुर्घटनाग्रस्त होत असल्याबाबत चर्चा उपस्थित केली होती. यावर बोलताना पठाण यांनी कल्याण-मलंगगड बसला लागलेल्या आगीचा मुद्दा मांडला होता. यावर प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर चौकशी पूर्ण होऊनही अहवाल का मांडला नाही, याबाबत मात्र कोणत्याही सदस्याने प्रशासनाला विचारणा केली नाही़ त्यामुळे आगीच्या घडणाऱ्या दुर्घटनांबाबत सदस्यांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)