‘ममी’चे रहस्य उलगडणार !
By Admin | Published: October 26, 2016 04:54 AM2016-10-26T04:54:10+5:302016-10-26T04:54:10+5:30
‘ममी’ म्हटले की इजिप्तची संस्कृतीच डोळ््यांसमोर येते. ‘ममी’ची संकल्पना मुळात तिथलीच. हे लहानपणापासूनच आपल्या मनावर कोरले आहे. ममी म्हणजे वषार्नुवर्ष पुरलेले
मुंबई : ‘ममी’ म्हटले की इजिप्तची संस्कृतीच डोळ््यांसमोर येते. ‘ममी’ची संकल्पना मुळात तिथलीच. हे लहानपणापासूनच आपल्या मनावर कोरले आहे. ममी म्हणजे वषार्नुवर्ष पुरलेले संरक्षित शव, इतकीच काय तिची ओळख. मात्र हे ‘ममी’चे विश्व मुंबईकरांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘ममी’ म्हणजे नेमके काय, ते कसे तयार केले जाते, वर्षानुवर्षे ते कसे जतन केले जाते, चित्रात दाखवतात तशीच ‘ममी’ असते का, ‘ममी’मागील रहस्य काय, या सगळ््या प्रश्नांचा उलगडा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील ‘ममी : अॅन अनसॉल्व्ह्ड मिस्ट्री’ या प्रदर्शनातून होणार आहे.
या प्रदर्शनात पर्यटकांना प्रत्यक्ष ‘ममी’ पाहण्याची संधी मिळणार आहे. या विषयीच्या संपूर्ण माहितीसह ममीकरणाची प्रक्रिया, शाब्ती, ओसिरिस, कॅट्रोनेज अशा सर्वांची माहितीसुद्धा सहज उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनातील ‘ममी’ आणि इतर संबंधित वस्तू २० व्या शतकाच्या प्रारंभापासून आहेत. मुंबई शहरातील ही एकमेव ‘ममी’ आहे. ममी इजिप्तिशियनांच्या मरणोत्तर जीवनावरील दृढविश्वासाचे प्रतीक आहे.
या प्रदर्शनाविषयी वस्तुसंग्रहालयाच्या प्रकल्प संचालक डॉ.मनीषा नेने यांनी सांगितले की, मुंबईतील एकमेव ‘ममी’ पहिल्यांदाच प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. इजिप्तच्या ‘ममी’ संस्कृतीविषयी सामान्यांमध्ये कुतूहल आहे, त्यामुळे याविषयी जाणून घेण्याची ही संधी वस्तुसंग्रहालयाने आणली आहे. या प्रदर्शनानंतर परदेशातील तज्ज्ञांसोबत ‘ममी’चे संवर्धन प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन २७ आॅक्टोबर ते ४ जानेवारी २०१७ काळात १०.३० ते ५ पर्यंत या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)
ममी कशी तयार होते?
मृतदेहावर एका शांत, शीतल, कमी आर्द्रता आणि कमी हवा असलेल्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून ‘ममी’ तयार केली जाते. रासायनिक प्रक्रियेत शरीरातील मेंदू काढून टाकला जातो. तो तसा निरुपयोगी असल्याचा समज तेथील संस्कृतीत असल्याने नाकाला छिद्रे पाडून त्यातून तो काढून टाकला जातो.
फुप्फुस, आतडे, मूत्रपिंडेही काढून टाकली जातात. नंतर त्यावर राळेचा लेप लावला जातो. डोक्याला मातीचा एक गोल लावला जातो. त्यानंतर शरीरात विविध धार्मिक चिन्हे बसवली जातात. नंतर ते संपूर्ण शरीर एका ज्युटसदृश कापडात गुंडाळले जाते. त्यानंतर ते एका लाकडी शवपेटीत ठेवले जाते. ही पेटी आणखी एका पेटीत ठेवली जाते. ही शेवटची पेटी रंगवलेली दिसते.