मुंबई - मनसे हिंदुत्वाची कास धरणार, तसेच मनसे आणि भाजपा एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच या चर्चेला दुजोरा देणारी घटना घडली आहे. भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात आज गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात आज मुंबईतील इंडिया बुल्स इमारतीत गुप्त बैठक झाली. एक तास चाललेल्या या भेटीबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय समीकरणे आणि भविष्यातील राजकीय गणितांवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान,महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याबरोबरच हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यास राज्यात भाजपा आणि मनसे असे युतीचे समीकरण उदयास येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
त्यातच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही भाजपासोबत युतीकरण्याबाबत सूचक संकेत दिले होते. ''आजवर शिवसेनेपासून शेकापपर्यंत सर्वच पक्षांना आम्ही मदत केली. पण, या सर्वांनी मनसेला किती मदत केली, त्याचा आम्हाला किती फायदा झाला हे तपासण्याची वेळ आली आहे. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.