Join us

शरद पवार अन् अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 2:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

मुंबई/ अहमदाबाद: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. याचपार्श्वभूमीवर शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. तसेच एका गुजराती दैनिकात शरद पवारांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन करण्यात आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. हे भाजपाचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

दरम्यान, अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपाच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसंच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रानं दिली आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला आहे.

टॅग्स :शरद पवारनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसअमित शहाभाजपा