Join us

गुप्त बैठका दोनशे लोकांसमोर विश्रामगृहावर होत नसतात - उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुप्त भेटी या दोनशे लोकांसमोर होत नसतात. पण, ज्यांना कोकणाने दोन वेळा नाकारले त्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुप्त भेटी या दोनशे लोकांसमोर होत नसतात. पण, ज्यांना कोकणाने दोन वेळा नाकारले त्यांनी माझे राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त भेट झाल्याचे ट्विट केले आहे. पण, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. तुमची दखल जनतेने घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नीलेश राणे यांना टोला लगावला.

तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असे ट्विट नीलेश राणे यांनी केले होते. यावर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. गुप्त भेट घ्यायची असेल तर रत्नागिरीच्या विश्रामगृहात २०० लोकांसमोर भेट का घेईन, असा प्रश्न करतानाच गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेन, असे ट्विट करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असे जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे, असेही सामंत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट सहा दिवसांपूर्वीची आहे. मी रत्नागिरी- सिंधुदुर्ग दौऱ्यावर होतो. रत्नागिरी विश्रामगृहावर एक वाजता पोहोचलो तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती, माजी मुख्यमंत्री समोर येतो तेव्हा स्वागत करण्याची पद्धत असते. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्याचे पालन करणे मी कर्तव्य समजतो. ती समोरासमोरची भेट होती. ज्यांनी आरोप केला, ते प्रचंड मागे होते. त्यामुळे कदाचित दिसण्यात फरक पडू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना मला मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे. अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बरोबर ठेवणार असू तर भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण काय असू शकते याची प्रचिती आजच्या ट्विटवरून कदाचित त्यांना आली असेल, असेही सामंत म्हणाले.