मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. पर्यावरण विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांची महिनाभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत सचिवांबाबत काही मंत्र्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा बदल केल्याचे समजते. फडणवीस सरकारमधील काही मंत्री आणि सचिवांमध्ये वादाचे प्रसंग वारंवार घडत आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे प्रधान सचिव सतीश गवई यांच्याशी पटत नव्हते. त्यामुळे मंत्री मेहता यांनी गृहनिर्माण विभागाचे काम बंद केले होते, तर गवई रजेवर निघून गेले होते. म्हणून गवर्इंची बदली जलसंपदा विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर श्रीकांत सिंह यांना गृहनिर्माण विभागात आणण्यात आले आहे. जलसंपदाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातदेखील सुसंवाद नव्हता. महाजन यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तशी तक्रारही केली होती. त्यामुळे मालिनी शंकर यांना जलसंपदातून काढून पर्यावरण विभागाचे सचिव करण्यात आले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मनुकुमार श्रीवास्तव यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती, तर गिरीश बापट यांनी दीपक कपूर यांच्याविषयी. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे संजय चहांदे आणि मेधा गाडगीळ यांच्या कामावर खूश नसल्याची चर्चा होती. पण शिक्षण विभागात कोणतेही बदल मुख्यमंत्र्यांनी आज केलेले नाहीत.मुख्य सचिवांची मध्यस्थीमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केल्याचे कळते. श्रीकांत देशपांडे युनायटेड नेशनला जात आहेत. वित्त व नियोजनसारख्या महत्त्वाच्या विभागात सुधीर श्रीवास्तव यांच्यानंतर दुसरा अधिकारी नाही. तेथे सीताराम कुंटे यांना पाठवावे आणि पुढे नंबर १ची जागा त्यांना द्यावी, गवर्इंना जलसंपदा देऊन नाराजी दूर करावी आणि त्याचवेळी मालिनी शंकर यांनादेखील पर्यावरण देऊन शांत करावे अशी शिष्ठाईची भूमिका क्षत्रिय यांनी मांडली आणि यातून मार्ग काढल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोल्हापुरात कानमंत्रआमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करता, पण आम्हाला जे हवे ते सचिवही मिळणार नसतील तर आम्ही काम तरी कसे करायचे? सचिवांनी फायलीवर काही लिहिले तर ते ओव्हररुल कसे करायचे हे अनेक नव्या मंत्र्यांना माहिती नाही. अशा वेळी कामे तरी कशी करायची, असा सवाल एका ज्येष्ठ मंत्र्यांने उपस्थित केला होता. त्यानंतर पक्षाध्यक्ष शहा यांनी सामोपचाराने राज्य चालवा, असा कानमंत्र दिला.अन्य बदल्या अशा सुनील पोरवार : अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन, मालिनी शंकर : प्रधान सचिव, पर्यावरण, सतीश गवई : प्रधान सचिव, जलसंपदा, सीताराम कुंटे : प्रधान सचिव, व्यय, वित्तविभाग, श्रीकांत सिंह : प्रधान सचिव, गृहनिर्माण, आर.जी. कुलकर्णी : अतिरिक्त आयुक्त, नाशिक, ए.आर. शिंदे : सह आयुक्त, विक्रीकर, महेंद्र कल्याणकर : सीओ, चंद्रपूर जिल्हा परिषद, आशुतोष सलील : जिल्हाधिकारी, वर्धा, राहुल द्विवेदी : जिल्हाधिकारी, वाशिम, आर.व्ही. निंबाळकर : सीओ, भंडारा जिल्हा परिषद
मंत्र्यांच्या तक्रारीनंतर सचिवांच्या बदल्या
By admin | Published: May 27, 2015 1:50 AM