३० वर्षांपूर्वीच्या अपहारात ६० वर्षीय सचिवाला ६ महिने शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:48 AM2022-07-24T05:48:42+5:302022-07-24T05:49:16+5:30
बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरिचंद्र वाणी (६०) हे सचिव होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर (जि. जळगाव) : बहादरपूर ता. पारोळा येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत ३० वर्षांपूर्वी ३४ हजार रुपयांचा अपहार झाला होता. यात पारोळा कोर्टाचा निकाल कायम ठेवून अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने ६० वर्षीय सचिवाला सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरिचंद्र वाणी (६०) हे सचिव होते. सन १९८८ ते १९९२ च्या कालावधीतील लेखा परीक्षणात चेअरमन आणि सचिव यांनी संस्थेतून १ हजार ५०० रुपये व १५ हजार रुपये काढल्याचे चेक काउंटरवर दर्शविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जिल्हा बँकेत २१ हजार ५०० रुपये तसेच १५ हजार रुपये काढल्याचे उघडकीस आले होते. म्हणजे संस्थेत १६ हजार ५०० रुपये जमा असल्याचे दाखविण्यात आले. लेखा परीक्षणात आढळलेल्या त्रुटीनुसार अपर लेखा परीक्षक शांताराम नथ्थू पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात १९९३ मध्ये अपहार झाल्याची फिर्याद दिली. त्यावरून चरणसिंग जाधव व राजेंद्र वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारोळा न्यायालयाने या प्रकरणी १७ मे २०१८ रोजी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, चरणसिंग जाधव यांचा मृत्यू झाला होता. राजेंद्र वाणी यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.