- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 24 वॉर्डमधल्या नाल्यांचा गाळ काढते. अनेकदा कंत्राटदाराकडून गाळ काढला गेला नसल्याने मुंबईची तुंबई झाल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. यामुळे महापौरांनी यंदा सावधगिरीचे पाऊल उचलले आहे.
महापौर नाले सफाईचे काम पाहायला येणार म्हटल्यावर पालिका प्रशासन व कंत्राटदार जागरुक असतात. त्यामुळे याचा सुगावा पालिका प्रशासनाला लागू न देता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज कांदिवली पश्चिम चारकोप व बोरीवली पश्चिम गोराई येथील नाल्यांची पाहणी केली.
महापौरांनी अचानक पाहणी केल्याने कंत्राटदारांची भंबेरी उडाली. मुंबईकरांना पावसाळ्यात पाणी तुंबून त्रास होऊ नये आणि नाल्यातील गाळ पूर्णपणे काढला जावा यासाठी आपण ठोस प्रयत्न करत असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
याबाबत लोकमतशी बोलताना महापौर म्हणाले की, मुंबईतील नाल्यांतील गाळ काढण्याचे काम प्रगतिपथावर असून आतापर्यंत 35 ते 40 टक्के तर कुठे त्यापेक्षा जास्त गाळ काढण्यात आला आहे. काल धारावी येथील नाल्याची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.