ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला कलम 144 लागू करण्यात आले आहे. या दरम्यान लोकांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका आणि वाहनांना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 17 जणांना ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत CRPC कलम 144 लागू केले. यामुळे पुढील दोन दिवस मोर्चे आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.
आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. याचवेळी, राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून यांपैकी 3 प्रकरणे मुंबईतील आणि 4 पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 17 रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील धारावीमध्येही ओमाक्रॉनचा रुग्णम समोर आला आहे.
टांझानियातून मुंबईत आलेला धारावीतील रहिवासी कोरोनाबाधित -टांझानिया येथून 4 डिसेंबरला मुंबईत आलेला धारावीतील रहिवासी कोरोनाबाधित असल्याने त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कातील दोघांची चाचणी करण्यात आली, यांपैकी कोणीही कोरोनाबाधित नाही.
राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 17 वर - राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि मुंबईत तीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. राज्यात 695 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 42 हजार 372 झाली आहे. तर, दिवसभरात 631 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 64 लाख 90 हजार 936 इतकी झाली आहे.