Join us

'देशातील धर्मनिरपेक्ष विचारधारेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चेहरा मिळाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 5:45 AM

वंचित बहुजन आघाडीतर्फे इस्लाम जिमखाना येथे तसेच अवामी विकास पक्षातर्फे साबू सिद्दीक सभागृहात रविवारी रात्री ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : देशाचे संविधान कायम राहिले तर देशवासीयांना मिळालेले स्वातंत्र्य कायम राहील. देशात धर्मनिरपेक्ष विचारधारा अद्याप जिवंत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याला चेहरा मिळाला आहे. विचार वाचवण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी लागते. जय-पराजय निवडणुकीत होत असतो. मात्र विचारधारा कायम ठेवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज असते. संविधान व विचारधारा वाचवण्यासाठी लढा उभारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. रविवारी ईद मिलननिमित्त त्यांनी मुस्लीम समाजाशी संवाद साधला.

वंचित बहुजन आघाडीतर्फे इस्लाम जिमखाना येथे तसेच अवामी विकास पक्षातर्फे साबू सिद्दीक सभागृहात रविवारी रात्री ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही विचारधारा पुढे नेण्याचा व संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांनी त्याला निर्भयपणे पुढे येऊन सशक्त करण्याची गरज आहे. याबाबत मुस्लीम समाजाने ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. भविष्यात काय होईल याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र अशा वातावरणात निर्भय होऊन आवाज उठवण्याची गरज आहे. धर्म ही स्वतंत्र बाब आहे. समाजात राहताना धर्मनिरपेक्ष विचारधारेने काम करणे काळाची गरज आहे. सध्या देशाची हिटरलशाहीकडे वाटचाल होत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी