राज्यभरातील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:34+5:302021-04-22T04:06:34+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जोखीम पत्करून कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना केली. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांत दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या.
बाधितांना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध कोरोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असा संदेश राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी दिला.
- भगतसिंह काेश्यारी, राज्यपाल
खबरदारी घेतली पाहिजे
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मृतांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच; पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
कडक शासन व्हायलाच हवे
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे; पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवे.
- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
दोन महिन्यांतील आठवी दुर्घटना
नाशिक येथील घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. दोन महिन्यांत महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये घडलेली ही आठवी दुर्घटना आहे. यामध्ये काही ठिकाणी कोविड सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे, तर काही ठिकाणी इतर कारणांमुळे लहान मुलांसह रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या रुग्णांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्यासह सुरक्षा आणि योग्य व्यवस्था पुरविण्याची आवश्यकता आहे.
- चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून, याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करायला हवी.
- प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
.............................