एस्प्लानेड मॅन्शनच्या भोवतालचा परिसर सुरक्षित करा - हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:17 AM2019-06-22T05:17:05+5:302019-06-22T05:17:15+5:30
उपाययोजनांची माहिती दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश
मुंबई : पादचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने म्हाडाला मोडकळीस आलेल्या एस्प्लानेड मॅन्शच्या भोवतालचा परिसर पादचाऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षित करण्याचा आदेश दिला.
दीडशे वर्ष जुनी ‘एस्प्लानेड मॅन्शन’ धोकादायक असल्याचे समजताच, म्हाडाने येथील रहिवाशांना इमारत खाली करण्याची नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, म्हाडाने या इमारतीच्या आजुबाजूने पादचारी जाऊ नये, यासाठी इमारतीच्या भोवताली बॅरिकडे्ट टाकले आहेत.
मात्र, या इमारतीचा वरील भाग व त्याचे सज्जे अद्याप छाकलेले नाहीत. इमारतीचा वरील भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इमारतीचा वरचा भाग आणि सज्जे झाकण्यात यावेत. पादचाºयांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असे म्हणत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांनी म्हाड व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, सहपोलीस आयुक्त यांना एकत्रित बैठक घेऊन पादचाºयांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे, याची माहिती दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.
एस्प्लानेड मॅन्शन धोकादायक असून, तिला पाडण्याची शिफारस आयआयटी मुंबईने केली आहे. या शिफारशीची अंमलबजावणी करण्याकरिता म्हाडाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेच्या हेरिटेज कमिटीने ही इमारत पाडण्याची आवश्यकता नसून, तिची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. हेरिटेज कमिटीकडून अद्याप यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही महापालिकेने न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयानेही आपण अद्याप म्हाडा किंवा महापालिकेचे म्हणणे मान्य केले नसल्याचे स्पष्ट केले.