सुरक्षा ११ जीवरक्षकांवर
By Admin | Published: February 7, 2016 02:50 AM2016-02-07T02:50:57+5:302016-02-07T02:50:57+5:30
मुरूडच्या समुद्रात पुण्याची १४ मुले बुडण्याची घटना घडली असतानाच मुंबईच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवर २८ कंत्राटी जीवरक्षकांना रविवारी
- मनोहर कुंभेजकर, मुंबई
मुरूडच्या समुद्रात पुण्याची १४ मुले बुडण्याची घटना घडली असतानाच मुंबईच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवर
२८ कंत्राटी जीवरक्षकांना रविवारी
(७ फेब्रुवारी) महापालिकेच्या अग्निशामक दलाने एक दिवसाचा ‘टेक्निकल ब्रेक’ दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे रविवारीच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा
गर्दी होत असते. अशा परिस्थितीत किनाऱ्यांवर दुर्घटना घडली तर
त्याला जबाबदार कोण, असा सवाल ‘सी गार्डियन लाइफगार्ड असोसिएशन’चे समन्वयक
सुनील कनोजिया यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवरील एकूण २८ कंत्राटी आणि ५ हंगामी जीवरक्षकांना एक दिवसाचा ‘टेक्निकल ब्रेक’ देण्यात आला आहे. त्यामुळे केवळ
११ कायमस्वरूपी जीवरक्षकांच्या हवाली या समुद्रकिनाऱ्यांची जबाबदारी आहे. कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांना सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर एक दिवसाचा ‘टेक्निकल ब्रेक’ देण्यात येतो. या जीवरक्षकांचा सहा महिन्यांचा काळ शनिवारी (६ फेब्रुवारी) संपत आहे. त्यामुळे हा ब्रेक देण्यात आला असून, सोमवारी (८ फेब्रुवारी) कंत्राटी व हंगामी जीवरक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत.
अग्निशमन दल काय म्हणते?
मुंबई अग्निशमन दलाकडे कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांच्या ‘टेक्निकल ब्रेक’विषयी विचारणा केली असता; दलाने सांगितले की, रविवारचा हा एक दिवसाचा ब्रेक टेक्निकल आहे.
सोमवारपासून पुन्हा कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षक कामावर रुजू होतील. सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर प्रशासनाकडून हा एक दिवसाचा ब्रेक देण्यात येतो.
- सहा महिन्यांच्या कार्यकाळाकरिता कंत्राटी जीवरक्षकांना दरमहा एकरकमी १० हजार रुपये वेतन मिळते. हंगामी जीवरक्षकांना दरमहा ८ हजार रुपये वेतन मिळते. सद्य:स्थितीमध्ये सहा समुद्रकिनारी ११ कायमस्वरूपी, २३ कंत्राटी आणि ५ हंगामी असे एकूण ३९ जीवरक्षक तैनात आहेत.
- रविवारी मुंबईतील जुहू, गिरगाव, आक्सा, गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे येथे जीवरक्षक असणे आवश्यकच आहे. नेमका याच दिवशी जीवरक्षकांची संख्य कमी असणार आहे.
सहा समुद्रकिनारी १३ कायमस्वरूपी, ३४ कंत्राटी आणि ३८ हंगामी अशा एकंदरीत ८५ जीवरक्षकांची अग्निशमक दलाला गरज आहे.
- रजनीकांत माशेलकर, निवृत्त जीवरक्षक
गोव्याच्या धर्तीवर येथील समुद्रकिनाऱ्यांचा चेहरा बदलला पाहिजे. किनाऱ्यावरील जीवरक्षकांना सुविधा देत त्यांची संख्या वाढवली पाहिजे. कंत्राटी व हंगामी जीवरक्षकांना कायमस्वरूपी कामावर घेतले पाहिजे.
- देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका