आजपासून होणार १०० रेल्वे स्थानकांचे सुरक्षा आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:47 AM2017-10-03T04:47:31+5:302017-10-03T04:48:08+5:30
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १०० स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १०० स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे. या कामासाठी १३ विशेष पथके नेमण्यात आली असून गर्दीच्या वेळी ही पथके स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी २९ व ३० सप्टेंबर रोजी मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करून उपनगरीय स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून १० दिवस उपनगरीय स्थानकांचे सुरक्षा आॅडिट होणार आहे. विशेष पथकात कमर्शिअल, आॅपरेटिंग, इलेक्ट्रिक-मॅकेनिक या रेल्वेतील विविध विभागांतील अधिकाºयांसह, शहर पोलीस, रेल्वे पोलीस, महापालिका अधिकाºयांचा समावेश असेल. यावेळी स्थानकांतील पादचारी पूल, फलाटांची उंची, पादचारी पुलांची अवस्था आणि अन्य बाबींची पाहणी करण्यात ये. या पाहणीचा तपशील आठवडाभरात करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पश्चिम रेल्वे स्थानकांची संख्या कमी आहे. या स्थानकांची पाहणी केल्यानंतर पाच दिवसांमध्ये तपशील सादर करण्यात येणार आहे.
सुरक्षा आॅडिटसाठी मोर्चेबांधणी
मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ७६ स्थानकांसाठी आठ पथके नेमण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान २४ स्थानकांसाठी पाच पथके सुरक्षा आॅडिट करणार आहेत.
समस्या-संबंधित विभाग-उपाय-अंमलबजावणी
स्थानकांवरील पाहणी झाल्यानंतर संबंधितांनी अहवालात उपायही सुचवणे अपेक्षित आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्थानकावर सुरक्षेसंबंधी संबंधित महाव्यवस्थापकाला सर्वाधिकार दिले आहेत.‘समस्या-संबंधित विभाग-उपाय-अमंलबजावणी’ या धोरणानुसार काम केले जाणार आहे. त्यामुळे अहवालातील उपायांपैकी योग्य त्या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या योजना या केवळ कागदावरच राहिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एल्फिन्स्टन दुर्घटना हे त्याचे उदाहरण आहे. रेल्वेमंत्र्यांनी कानउघडणी केल्यानंतर आता यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे नुसता देखावा न करता प्रत्यक्ष उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. तरच भविष्यात एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळता येईल. - समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता