Join us

‘गेट वे आॅफ इंडिया’वर सुरक्षा तपासणी

By admin | Published: December 14, 2015 2:06 AM

भारताचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेट वे आॅफ इंडिया’बाहेर तंबूमध्ये तात्पुरते सुरक्षा तपासणी नाके उभे करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी पूर्ण केली आहे.

डिप्पी वांकानी, मुंबईभारताचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेट वे आॅफ इंडिया’बाहेर तंबूमध्ये तात्पुरते सुरक्षा तपासणी नाके उभे करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी पूर्ण केली आहे. ही वास्तू ऐतिहासिक वारसा असल्याने तिला धक्का पोहोचू नये म्हणून या परिसरात पक्के बांधकाम करता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा तपासणीसाठी उपरोक्त निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दक्षिण मुंबईच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, गेट वे आॅफ इंडियाच्या सुरक्षेत सुधारणा केली जाणार आहे. मूळ वास्तूची हानी होऊ न देता तात्पुरते सुरक्षा तंबू उभे केले जातील. गेट वे आॅफ इंडियाची सुरक्षा व्यवस्था नेहमीच, विशेषत: २६/११ हल्ल्यावेळी चर्चेत आली होती. या परिसरात काही करावयाचे असेल तर पाच शासकीय संस्थांची परवानगी काढावी लागते. वास्तूजवळ सुरक्षा तपासणी केंद्रे स्थापन करण्यासाठी जमिनीत खड्डे खोदता येणार नाहीत, असे जागतिक वारसा हक्क संरक्षण समितीने स्पष्ट केल्यामुळे आता वास्तूबाहेर सुरक्षा तपासणीकरता तंबू उभारले जातील, असे समजते. खासगी कंपनीद्वारे हे काम करून घेतले जाईल. तंबूंमध्ये मेटल डिटेक्टर, सामानाची तपासणी करणारे स्कॅनर तसेच इतर उपकरणांनी पर्यटकांची तपासणी केली जाईल. तंबूत सीसीटीव्ही लावण्याचाही विचार आहे, असे पोलिसांनी सांगितले. गेट वे आॅफ इंडियाला समुद्राकडूनही चार प्रवेशद्वारे आहेत, तेथील सुरक्षा व्यवस्था पोर्ट ट्रस्टकडे आहे. एप्रिल महिन्यात अतिरिक्त सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या बाबींवर चर्चा झाली होती. ।। 26/11 चा दहशतवादी हल्ला या परिसरातच घडला व येथील महत्त्वाची ठिकाणे असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले होते. सबंधित ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते. ही स्थिती लक्षात घेता व लाल फितीत न अडकता तात्पुरत्या तंबूंचा मार्ग काढण्यात आला असून, वास्तूला धक्का न लावता सुरक्षा व्यवस्था भक्कम झाली तर फायदाच होईल, असे सूत्रांनी सांगितले. येथे तपासणी नाके असल्याचा संदेश दहशतवाद्यांपर्यंत जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.