Join us

सुरक्षा दल आणि रुग्णालयात पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

By जयंत होवाळ | Published: March 01, 2024 6:42 PM

महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱया सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे.

मुंबई: महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱया सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या  प्रणालीच्या वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर पालिका रूग्णालयांच्या  सुरक्षेसाठीही  कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरली जाणार आहे.

के.ई .एम., सायनचे लोकमान्य टिळक रुग्णालय ,  नायर रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रुग्णालय या प्रमुख चार रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. रूग्णालयाच्या परिसरात येणाऱया वाहनांसाठी तसेच रूग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेर्‍यांमुळे  रूग्णालयातील नातेवाईकांचे साहित्य व मोबाईलच्या  चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत. रूग्णालयाच्या परिसरातील जमाव, आग यासारख्या दुर्घटनांची माहिती नियंत्रण कक्षालाही या कॅमेऱयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. तसेच अग्निशमन दलालाही या कॅमेऱयाचा वापर करून सतर्क करणे शक्य आहे.

सुरक्षा दलात भरती प्रक्रियासहायक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक या पदाची भरतीची प्रक्रिया महत्वाच्या टप्प्यावर आहे. सहायक सुरक्षा अधिकारी (६५ पदे) आणि सुरक्षा अधिकारी (१४०० पदे) आदी रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

सुरक्षा दलाचे बळकटीकरण करण्यासाठी ई बटवडा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये ई बटवडा या मोबाईल ॲपचा वापर येत्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. तसेच या मोबाईल ॲपचा वापर प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपल्या कामाचे ठिकाण कळण्यासाठी तसेच उपस्थिती लावण्यासाठी होणार आहे. या एप्लिकेशनमध्ये जिओ फेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच एखादा मोर्चा किंवा जमाव याबाबतची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर करता येईल. आपत्कालीन प्रसंगी थेट प्रक्षेपण करण्याची तसेच दृकश्राव्य चित्रिकरण करण्याची सुविधादेखील या ॲपमध्ये देण्यात आली आहे.

सुरक्षा रक्षकांच्या चौक्यांमध्ये कीटकनाशक संयंत्रेघनकचरा विभाग तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यासारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारी वर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे  पालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक संयंत्रे लावण्यात येणार आहेत. एकूण सात ते दहा टप्प्यात ही संयंत्रे उपलब्ध केली जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५ संयंत्रे  सुरक्षा रक्षकांच्या विविध चौक्यांमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी  अजित तावडे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका