मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे.
राज्यातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर, सरकारमधील काही मंत्र्यांच्या कुटुंबियांना व नेत्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. यामध्ये युवासेनेचे सचिव असेलेले वरुण सरदेसाई यांना सुद्धा एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मनसेने टोला लगावला आहे. वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्याने घेतलेलं दिसतंय, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावलेला आहे.
वरुण सरदेसाई यांना सुरक्षा पुरवण्यावरुन भाजपानेही निशाणा साधला आहे. सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्यांना जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्यांनी मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळं अनेक नोकरशाह त्यांच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळं त्यांना सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती,' असं म्हणत भाजापाचे आमदार नितेश राणेंनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण- केशव उपाध्ये
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
''ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे; त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार''- मनसे
राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील फेसबुक पोस्टद्वारे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.