विनामास्क लोकांवर सुरक्षा रक्षकांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:51+5:302021-02-23T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केईएम रुग्णालयात कोरोनाविषयक नियमांचे सक्तीने पालन केले जात आहे. केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळच्या सुमारास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केईएम रुग्णालयात कोरोनाविषयक नियमांचे सक्तीने पालन केले जात आहे. केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळच्या सुमारास पाहणी केली असता विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर सुरक्षारक्षकांची करडी नजर असल्याचे दिसून आले आहे.
केईएम रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात वा रुग्णालयाच्या आवारात बसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षक या व्यक्तिंना मास्कचा वापर करण्याविषयी वारंवार सांगत असल्याचे दिसून आले. रुग्णालयात प्रमुख प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात प्रवेश करणारे सर्व नागरिक याचा वापर करत नसल्याने याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही सुरक्षारक्षकांवर असल्याचे दिसले. रुग्णालयात येणाऱ्या लहानग्या मुलांच्या आरोग्याविषयी पालक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. बऱ्याचदा सोबत असणारी लहान मुले विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा काही नियम न पाळणाऱ्या नागरिकांचाही सुरक्षा व्यवस्थेवर ताण येत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभागांमध्ये उपचार घेण्यासाठी सकाळच्या सुमारास रुग्णांची अधिक गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी विशेष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, वेळोवेळी रुग्णालयाच्या आवारात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होताना दिसल्यास रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिकाही या व्यक्तिंना समज देत आल्याचे दिसून आले.
याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग पूर्ण बंद होता. मात्र, सध्या अनलॉक सुरू असल्याने सर्व विभाग कार्यान्वित आहेत. सध्या शहर उपनगरातील संसर्गाचा वाढता धोका पाहता कोरोनाविषयक नियम अधिक काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत. शिवाय त्याविषयी सुरक्षारक्षक व संबंधित विभागांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.