अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:10 AM2019-11-07T05:10:16+5:302019-11-07T05:10:42+5:30
अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांच्या सदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली.
मुंबई : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशात शांतता कायम राहावी म्हणून, मुंबईसह राज्यभरातील संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील हालचालींवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांच्या सदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली. गोगाई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठेही जल्लोष अथवा रोष व्यक्त होता कामा नये याबाबतचे आदेश सर्वत्र देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीदेखील विविध धर्मांच्या प्रमुखांसोबत एक बैठक घेतली आणि निकाल काहीही असला तरी, त्याला एक भारतीय नागरिक म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान कुठल्याही अफवा पसरू नयेत याबाबातही खबरदारी म्हणून सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवून आहेत. अफवा पसरविणे गुन्हा असून, कोणीही याला खतपाणी घालू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.