मुंबई : अतिरेकी हल्ल्यासारखी घटना एखाद्या शाळेत घडल्यास शिक्षकांनी कशाप्रकारे विद्यार्थ्यांची आणि स्वत:ची सुरक्षा करायला हवी, यासाठी कुर्ल्यामध्ये शिक्षक-पोलीस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील २०० शिक्षकांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या परिषदेत शिक्षकांसह शाळांना पोलिसांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या.पाकिस्तानमधील पेशावर येथे महिनाभरापूर्वीच एका आर्मी शाळेवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप चिमुरड्यांना जीव गमवावा लागला़ मुंबईत देखील अशा प्रकारचा हल्ला एखाद्या शाळेवर झाल्यास शिक्षकांनी कशाप्रकारे विद्यार्थ्यांची आणि स्वत:ची सुरक्षा केली पाहिजे, यासाठी कुर्ल्यातील नेहरूनगर पोलिसांमार्फत येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये शनिवारी शिक्षक-पोलीस परिषद घेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला झोन सहाचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश भवर, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे ट्रस्टी, वकील आणि या परिसरातील दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांनी या परिषदेला उपस्थिती दिली. शाळेच्या आवारात जर कोणी संशयास्पद व्यक्ती अथवा एखादी वस्तू दिसल्यास शिक्षकांनी तत्काळ ही बाब मुख्याध्यापक किंवा पोलिसांना कळवावी, असे अवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले़ शिवाय सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यामुळे शाळेतच असताना विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी पहिली जबाबदारी शिक्षकांची असते. अनेक शिक्षकांना अमली पदार्थांची माहिती नसते. कोणती व्यसने धोकादायक आहेत, अमली पदार्थांचा वापर कसा केला जातो, हे शिक्षकांना सांगण्यात आले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारामध्येही गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. अनेक मुली ओळखीतल्या अथवा घरातील व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडतात. या मुलींना धमकावले जात असल्याने ही बाब त्या कोणालाही सांगत नाहीत. यासाठी प्रत्येक शाळेत महिला सुरक्षा कमिटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्याचार उघडकीस येतील आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांकडून शिक्षकांना सुरक्षेचे धडे
By admin | Published: January 19, 2015 12:41 AM