मुंबई : सिम कार्ड बंद होण्याच्या नावाखाली सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील एका नामांकित विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकाची ६१ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूरचे रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय तक्रारदार यांना ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोबाइलवर केवायसी अपडेट न केल्यामुळे सिम कार्ड बंद होणार असल्याचा संदेश धडकला. सिम कार्ड बंद होण्याच्या भीतीने त्यांनी दुपारच्या सुमारास संदेशात असलेल्या क्रमांकावर कॉल करून याबाबत चौकशी केली. संबंधित कॉलधारकाने केवायसी अपडेट करण्यास सांगितले. तसेच त्यासाठी १० रुपये ऑनलाइन भरावे लागतील, असेही नमूद केले.
फोन सुरू असताना ठगांनी आणखीन एक लिंक मोबाइलवर धाडून त्यात माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी क्रेडिट कार्डवरून पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे गेले नाहीत. पुढे ठगाने नेट बँकिंगद्वारे पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी व्यवहार करताच त्यांच्या खात्यातून आधी ५१ हजार वजा झाले. त्यानंतर १० हजार ५०० रुपये गेले. त्यांनी याबाबत कॉलधारकाकडे विचारणा करताच त्याने काहीही माहिती नसल्याचे सांगून फोन कट केला. यात त्यांना संशय आल्याने, त्यांनी बुधवारी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.