प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षाव्यवस्था, राज्याला अतिदक्षतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:34 AM2020-01-26T04:34:58+5:302020-01-26T04:35:02+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून एनआरसी, सीएए, एनआरपीच्या मुद्द्यावरून देशभरात असंतोषाचे वातावरण आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची व गर्दीच्या ठिकाणी कडकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केले आहे. मुंबईसह प्रमुख शहरांतील बसस्थानके, मॉल्सच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून श्वानपथकाद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून एनआरसी, सीएए, एनआरपीच्या मुद्द्यावरून देशभरात असंतोषाचे वातावरण आहे. या कायद्याला विरोध होत असून अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीच्या निमित्ताने अतिरेकी संघटना, समाजकंटकांकडून घातपाती कृत्य घडविले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी महत्त्वाची, अतिमहत्त्वाची ठिकाणे, रेल्वे, बसस्थानके या सार्वजनिक ठिकाणी विशेष दक्षता बाळगावी, असे आदेश पोलीस महासंचालक जायसवाल व मुंबईचे आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत.
अतिदक्षतेच्या उपाययोजना म्हणून पोलिसांकडून शनिवार रात्रीपासून मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांकडून विशेष खबरदारी
- प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना, संस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम लक्षात घेता या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसंकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.