मुंबई : मुंबई महापालिकेची सुरक्षा यंत्रणा आणखी भक्कम होणार असून, पालिका मुख्यालयाच्या हेरिटेज व विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारावर नवीन मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत, तर येत्या काही दिवसांत बॅग स्कॅनर बसवण्यात येणार आहेत.
मुख्यालयातील मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनर नादुरुस्त असल्याने मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा काहीशी कमकुवत झाली होती. सुरक्षा उपकरणाच्या अभावी सुरक्षारक्षकांवर अतिरिक्त ताण पडत होता. तो ताण आता काही प्रमाणात कमी होईल. मुख्यालयात प्रवेश करताना मेटल डिटेक्टर बसवले आहे. अनेक दिवसांपासून पूर्वीचे मेटल डिटेक्टर नादुरुस्त आहेत. त्यामुळे मुख्यालयात येणाऱ्यांची व्यवस्थित तपासणी होत नव्हती. सामानाची तपासणी करणेही अवघड झाले होते. बॅग स्कॅनरच्या अभावी सामान तपासणीत अडचण येत होती.
सीसीटीव्हीसाठी तरतूद-
१) तपासणीतील उणीव दूर करण्यासाठी पालिकेने नवीन मेटल डिटेक्टर खरेदी केले आहेत. ते आता मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आले आहेत.
२) बॅग स्कॅनरमुळे सामानाची तपासणीही जलदगतीने करणे शक्य होईल. मुख्यालयाच्या धर्तीवर २५ विभाग कार्यालयातही मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनर बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय पालिकेच्या महत्त्वाच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणीही सुरक्षा यंत्रणा भक्कम केली जाणार आहे.
३) पालिका मुख्यालय, विभाग कार्यालये आणि अन्य मालमत्तांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वर्षभरात ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.