सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहाची सुरक्षा रामभरोसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:50 AM2023-06-08T08:50:13+5:302023-06-08T08:51:09+5:30
सीसीटीव्ही यंत्रणा वर्षभरापासून बंद, अनेक त्रुटीही आल्या उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : साडे चारशे विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या चर्नी रोडच्या सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहात सध्या ४० ते ४५ तरुणी राहण्यास आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. फक्त तळ मजल्यावरील काही सीसीटीव्ही सुरू आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेबाबत वसतिगृह प्रशासनाने संबंधित यंत्रणेकडे सीसीटीव्हीबाबत कळविल्याचे सांगण्यात येत आहे. ते नेमके कुठे रखडले याबाबतचा अहवाल मागविण्यात आला असून याबाबत सविस्तर तपास करण्यात येईल असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सुप्रदा प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी वसतिगृह प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच, याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. फातर्पेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वसतिगृहात सध्या ४० ते ४५ मुली राहण्यास आहे. वॉर्डनने दिलेल्या माहितीत अधिकृत टेंडरिंग पद्धतीने सुरक्षा रक्षकाला कामावर ठेवण्यात आले होते. तसेच, प्रत्येक मजल्यावर मुली राहण्यास होत्या. मात्र, परीक्षा संपल्याने त्यांच्याकडून खोली रिकामी करण्यात येत आहे. तसेच वसतिगृहाच्या दुरवस्थेमुळे फेब्रुवारी महिन्यात त्यांना खोली रिकामी करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानुसार, मुलींना दुसऱ्या वसतिगृहात हलविण्याचे काम सुरू होते.
सीसीटीव्हीबाबत विचारणा करताच ते गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचे समजले. वसतिगृहाने याबाबत पाठपुरावादेखील केला असल्याचे सांगितले आहे. मात्र याबाबत अधिक माहिती घेत असल्याचे फातर्पेकर यांनी सांगितले आहे. तसेच येत्या दिवसांत अन्य शासकीय वसतिगृहांचाही आढावा घेण्यात येईल. पुढे अशी घटना घडू नये याबाबत कठोर पावले उचलत योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले आहे.
...म्हणून सपोर्ट स्टाफ
वसतिगृहात एकूण २५० खोल्या आहेत. वसतिगृहात आम्हाला रात्रीच्या वेळेस २ सुरक्षारक्षकांची गरज लागते, परंतु गेल्या वर्षी सरकारकडून सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही संबंधित व्यक्तीला सपोर्ट स्टाफ म्हणून ठेवले. वसतिगृहाच्या प्रत्येक खोलीत २ मुली राहतात. संबंधित मुलीच्या खोलीमध्येही एक मुलगी राहत होती. परंतु ती आता शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तिची परीक्षा संपल्याने याच वर्षी तिने वसतिगृह सोडल्याचे वसतिगृहाच्या अधीक्षक वर्षा अंधारे यांनी सांगितले.