आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:35 AM2018-10-31T00:35:49+5:302018-10-31T07:09:57+5:30
अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, गाळे आणि यामध्ये काम करणारे कामगार अथवा नागरिकांचा अशा दुर्घटनांत बळी जात असून, त्यांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आगीच्या अनेक घटना घडत असल्या, तरी अद्यापही प्रशासन जागे होत नसल्याचे चित्र आहे. अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, गाळे आणि यामध्ये काम करणारे कामगार अथवा नागरिकांचा अशा दुर्घटनांत बळी जात असून, त्यांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, झोपड्यांना आग लागल्यानंतर झोपडी अधिकृत की, अनधिकृत यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, या सगळ्यात झोपड्यांची आणि तेथे राहत असलेल्या माणसांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. वांद्रे पश्चिमेतील नर्सिंग दत्त नगरला मंगळवारी लागलेल्या आगीनंतर झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसल्या आहेत. यात वांद्रे, कुर्ला, साकीनाका, अंधेरी, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार, सांताक्रुझ, जोगेश्वरी आणि दहिसर येथील झोपड्यांचा समावेश होतो. मुळात या झोपड्या अत्यंत दाटीवाटीने वसल्या असून, चिंचोळ्या गल्ल्या आणि झोपड्यांचे मजल्यावर मजले उभे राहिल्याने, येथील घडलेल्या आपत्कालीन घटनांत कायमच नागरिकांना त्रास होत आहे. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे शहर अभ्यासकांचे मत आहे. अग्निसुरक्षाविषयक घटकांकडे करण्यात येत असलेल्या दुर्लक्षामुळे मागील काही वर्षांत मुंबई शहर आणि उपनगरातील आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे.
कुर्ला परिसरात झोपड्यांचे प्रमाण अधिक आहे. येथील खैरानी रोडसह लगतचा परिसर हा मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. या परिसरात अनेक झोपड्या असून, मोठ्या प्रमाणावर भंगारसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे गाळे आहेत. ते साधारण दहा-बाय दहासह पन्नास बाय पन्नासचे आहेत. फरसाणसारखे अनेक उद्योगधंदे या परिसरात चालविले जात आहेत. मुंबईत सर्वाधिक अनधिकृत बांधकामे ही ‘एल’ वॉर्डच्या हद्दीत आहेत. येथील गाळ्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे गाळ्यातच राहतात. कुर्ला हे फक्त निमित्त आहे. कुर्ला, वांद्रे, अंधेरी आणि दहिसर मुंबईत ठिकठिकाणी अशीच अवस्था आहे.
वर्षभरातील आगीच्या घडलेल्या घटना...
चर्चगेट, बी. रोडवरील सिडनहॅम महाविद्यालयाच्या तिसºया मजल्यावरील लागलेल्या आगीत जुनी पुस्तके, लायब्ररीमधील कोरीव व दुर्मीळ फर्निचर जळून खाक झाले होते.
गोरेगाव पूर्वेकडील हब मॉलमध्ये लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी झाली होती.
लोअर परळ पश्चिमेकडील फिनिक्स मॉलसमोरील किमजी नामजी चाळीला लागलेल्या आगीत वित्तहानी झाली होती.
चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात लिबर्टी शू मार्टला लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी झाली होती.
कुर्ल्यातील कपाडियानगरच्या कुरैय्या कंपाउंडमधील कपड्यांसह भंगारच्या गोदामांना लागलेल्या आगीने मोठी हानी झाली होती.
मानखुर्द मंडाळा येथील ४०० बैठ्या शेडला लागलेली आग रसायनांच्या साठ्यामुळे भडकली होती.
मुलुंडहून अंधेरीकडे जाणाºया बेस्ट बस क्रमांक ३९६ने चकाला येथे पेट घेतल्याची घटना घडली होती.
चकाला येथील हॉटेल समराजमध्ये लागलेल्या आगीत बारा जण जखमी झाले होते.
विद्याविहारमधील ओएसिस स्कायलाइन सोसायटीच्या तळघराच्या आगीत १२ गाड्या खाक झाल्या.
गोवंडतील फूड गोदामाला लागलेल्या आगीत मोठी आर्थिक हानी झाली होती.
जवाहर दीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळून येथील इंधनाच्या टँकना आग लागली होती.
बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू असतानाच लागलेल्या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.
विक्रोळी, गांधीनगरमध्ये बांधकामाधीन इमारतीत लागलेल्या आगीचा वाहतुकीवर परिणाम झाला होता.
जुन्या चाळी आणि इमारतींमधील ४० वर्षे जुन्या सदोष वायरिंगने आगीच्या अपघातांचा धोका वाढला आहे.
प्रत्येक महिन्यात दोनशे ते अडीचशे दुर्घटना घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे.
२०१६ मध्ये दरमहा सरासरी ३००-३५० दुर्घटना घडल्या आहेत. ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा आहे.
बहुतांश आगींमागचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षांत आगीच्या दुर्घटनांमध्ये आठ जवानांना प्राण गमवावे लागले. यात ३ जवान आणि ५ अधिकाºयांचा समावेश आहे.
२०१२ पासून एप्रिल २०१८ पर्यंत एकूण २९ हजार १४० आगी लागण्याच्या घटना घडल्या. यात एकूण ३०० जणांचा मृत्यू झाला, तर एकूण ९२५ जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले. १२० अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी आगीच्या दुर्घटनांत जखमी झाले.
२०१२-२०१३ : ४ हजार ७५६ आगीच्या घटना घडल्या. यात ६२ लोकांचा मृत्यू झाला. १७७ लोक जखमी झाले.
२०१३-२०१४ : ४ हजार ४०० आगीच्या घटना घडल्या. ५८ लोकांचा मृत्यू झाला. १४१ लोक जखमी झाले.
२०१४-२०१५ : ४ हजार ८४२ आगीच्या घटना घडल्या. ३२ लोकांचा मृत्यू झाला. १२५ लोक जखमी झाले.
२०१५-२०१६ : ५ हजार २१२ आगीच्या घटना घडल्या. ४७ लोकांचा मृत्यू झाला. १२८ लोक जखमी झाले.
२०१६-२०१७ : ५ हजार २१ आगीच्या घटना घडल्या. ३४ लोकांचा मृत्यू झाला. ११५ लोक जखमी झाले.
२०१७-२०१८ : ४ हजार ९२७ आगीच्या घटना घडल्या. ५५ लोकांचा मृत्यू झाला. २१९ लोक जखमी झाले.