सुरक्षा पर्यवेक्षकाची पवईमध्ये हत्या
By admin | Published: April 19, 2017 03:11 AM2017-04-19T03:11:03+5:302017-04-19T03:11:03+5:30
पवई तलावात मासेमारी करून मासे चोरी करणाऱ्यांना मज्जाव केल्याच्या रागातून तेथे तैनात केलेल्या सुरक्षा पर्यवेक्षकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना
मुंबई : पवई तलावात मासेमारी करून मासे चोरी करणाऱ्यांना मज्जाव केल्याच्या रागातून तेथे तैनात केलेल्या सुरक्षा पर्यवेक्षकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तबरेज खान (२६), सलीम सिद्दिकी (२०) अशी आरोपींची नावे आहेत.
पवई तलावातून मासेमारी करून मासे चोरी होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशन बोट क्लबद्वारे तेथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास खान आणि सिद्दिकी तेथे लपून मासेमारी करत असल्याचे तेथील सुरक्षारक्षक गुलाब शेख (२३) यांच्या निदर्शनास आले. याचदरम्यान सुरक्षा पर्यवेक्षक असलेले शोएब सन्नाउल्ला खान (५०) यांनी त्यांना विरोध केला. याच रागात आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. तसेच, त्यांच्यासह गुलाम शेख आणि धर्मेद्र वर्मा यांचा मोबाइल हिसकावून आरोपींनी त्यांच्या बोटीचेही नुकसान केले. त्यानंतर त्यांना ढकलून पळ काढला. अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने खान यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)