सत्तांतर नाट्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:44 AM2019-11-27T06:44:28+5:302019-11-27T06:44:55+5:30
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तैनात केलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे मंगळवारी मुंबईला छावणीचे स्वरूप आले होते.
मुंबई : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तैनात केलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे मंगळवारी मुंबईला छावणीचे स्वरूप आले होते. यात, महाविकास आघाडीचे आमदार वास्तव्यास असलेल्या लेमन ट्री, सोफीटेल, ग्रॅण्ड हयात, जे डब्ल्यू मॅरियट या हॉटेलांबाहेर विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
मंत्रालयासह राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची शहरातील निवासस्थाने आणि राजकीय नेते मंडळी थांबलेल्या हॉटेल्स परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील सत्ताकारणात नवीन ट्विस्ट येऊन शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे याचे राजकीय पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेतून पोलिसांनी शनिवारी सकाळपासूनच बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी नेत्यांची राजकीय वक्तव्ये, पत्रकार परिषदा यासोबतच सोशल मीडियावर करडी नजर ठेवत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. महाविकास आघाडीचे आमदार ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते तेथेही कडेकोट बंदोबस्त होता. राजकीय घडामोडी, २६/११ बंदोबस्तामुळे पोलिसांवरचा ताण वाढलेला दिसून आला. यापुढेही तो कायम राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पाच हजार सीसीटीव्हींद्वारे प्रत्येक घडामोडीवर लक्ष
सोशल मीडियासह सर्व राजकीय हालचालींवर पोलीस नजर ठेवून आहेत. बुधवारी विधान भवन येथे होणाºया शपथविधीसाठी परिसराबाहेरही पोलिसांचा खडा पहारा तैनात आहे. यात, पासशिवाय कुणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय, सोमवारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी स्वत: तेथे जात सुरक्षेचा आढावा घेतला होता. शहारात ५ हजार सीसीटीव्हींद्वारे मुंबई पोलीस सर्व घटनांकडे लक्ष ठेवून आहेत.