बॅटरी चोरांच्या शोधात सुरक्षा दल
By admin | Published: June 23, 2016 03:49 AM2016-06-23T03:49:17+5:302016-06-23T03:49:17+5:30
माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून बॅटरी चोरीला गेल्या आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला चांगलाच फटका बसला.
मुंबई : माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून बॅटरी चोरीला गेल्या आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला चांगलाच फटका बसला. या घटनेनंतर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून बॅटरी चोरांची अजूनही शोधमोहीम घेण्यात येत आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून रुळाजवळ असणारा झोपडपट्टीचा परिसरही पिंजून काढला जात आहे.
२0 जून रोजी पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील विद्युत उपकेंद्रातून १८ बॅटरी चोरीला गेल्या आणि दादर ते माहीम स्थानकादरम्यान सर्व मार्गांवरील लोकल खोळंबल्या. याआधीही याच उपकेंद्रातून तब्बल ५७ कमी क्षमतेच्या बॅटरी चोरीला गेल्या होत्या. दोन्ही घटनांनंतर पश्चिम रेल्वेकडून या वीज उपकेंद्राला सुरक्षा पुरवणे आवश्यक होते.
मात्र तसे न केल्याने पुन्हा चोरीची घटना घडली. ज्या उपकेंद्रात चोरी झाली त्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून, तेथे शोधमोहीम घेतली जात आहे. त्याचप्रमाणे संशयितांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
दादर, माहीम स्थानकातीलही सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे जीआरपी आणि शहर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. रेल्वेच्या महत्त्वाच्या मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येतात का, याची पडताळणी केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन वेळा चोरी झाल्याने यात रेल्वेतील कुणी सामील तर नाही ना, याचा शोध घेतला
जात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)