पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

By admin | Published: March 28, 2016 02:21 AM2016-03-28T02:21:52+5:302016-03-28T02:21:52+5:30

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळांवर अद्यापही आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात प्रशासन उदासीन दिसून येत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पुरेसा निधी

Security threatens tourists | पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळांवर अद्यापही आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात प्रशासन उदासीन दिसून येत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पुरेसा निधी संबंधित यंत्रणांकडे नसल्याने पर्यटकांना जीव मुठीत घेऊनच पर्यटनाचा आनंद लुटावा लागत आहे. परीक्षांचा हंगाम संपून लवकरच सुट्यांचा मोसम सुरु होणार आहे. पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी त्या निमित्ताने जोर धरत आहे.
समुद्रकिनारी पर्यटन करण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. मौजमस्ती करण्यामध्ये तरुणांच्या जोडीने महिलांसह वृध्दही जोशात असतात. रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि स्वच्छ असा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनारी मोठ्या संख्येने हॉटेल, रेस्टारंट, रिसॉर्ट, कॉटेजेस् विकसित झाली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. या पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आर्थिक आलेख सातत्याने उंचावलेला आहे.
अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे १५ वर्षात शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. मध्यंतरी पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना मुरुड समुद्रामध्ये जीव गमवावा लागला होता.
अलिबाग, किहीम, वरसोली, नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, घारापुरी ही पर्यटकांची आवडीची ठिकाणे आहेत. काही पर्यटनस्थळांकडे जाताना संबंधित ग्रामपंचायत काही ठरावीक रक्कम करापोटी आकारते. मात्र सोयीसुविधांबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे.

सुरक्षेतील त्रुटी
- सुरक्षेसाठी असणारे वॉच टॉवर अस्तित्वात नाही.
- धक्कादायक बाब म्हणजे घारापुरी, नागाव, दिवेआगर, हरिहरेश्वर या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त कोठेही सायरन व्यवस्था नाही.
- अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरुड महाड या व्यतिरिक्त कोठेही वाहनतळ उपलब्ध नाही. सूचना फलक मात्र पर्यटनस्थळी लावलेले आहेत.
- घारापुरी येथे २० लाइफगार्ड आहेत, तर वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, धोकवडे या ठिकाणी प्रत्येकी १० लाइफगार्ड तैनात असून अलिबाग, नागाव येथे प्रत्येकी पाच, तर काशिद येथे दोन लाइफगार्ड ठेवण्यात आले आहेत.
- बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु अग्निशमन यंत्रणा नाही.
- अलिबागला एक बोट आहे, तर श्रीवर्धन, मुरुड या प्रमुख समुद्र किनारी अद्याप बोटींचा पत्ता नाही.

पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधा देणे, सुरक्षा व्यवस्था पुरविणे यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न अल्प असल्याने निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सागर पाठक,
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

सरकारने ग्रामपंचायतींना सुरक्षेची साधने पुरविली आहेत. अग्निशमन यंत्रणा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच पर्यटनस्थळांवर आहेत. मदतीसाठी आमच्या सदस्यांची मदत घेतली पाहिजे.
-जयपाल पाटील, नागरी संरक्षण दल

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जास्त सुविधा दिल्या, सुरक्षेचे उत्तम उपाय अवलंबिले, तर पर्यटन व्यवसायाला अधिक भरभराट होईल.
- नितीन खरात, पर्यटक

Web Title: Security threatens tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.