Join us

सुरक्षारक्षकांमुळे डॉक्टरांचीच सुरक्षा धोक्यात

By admin | Published: November 03, 2015 1:27 AM

सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षारक्षकांपासूनच सुरक्षा धोक्यात येण्याचा प्रकार केईएम रुग्णालयात घडत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांवर सध्या केईएम रुग्णालयातील

मुंबई : सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षारक्षकांपासूनच सुरक्षा धोक्यात येण्याचा प्रकार केईएम रुग्णालयात घडत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांवर सध्या केईएम रुग्णालयातील डॉक्टर विचार करत आहेत. केईएम रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हॉस्टेलमध्ये राहणारे डॉक्टर खासगी सुरक्षारक्षकांमुळेच कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यासंदर्भात डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रारदेखील केली आहे. डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण, रुग्णालयाची तोडफोड असे प्रकार वाढीस लागल्याने पालिका रुग्णालयांमध्ये खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ म्हणून हा उपाय करण्यात आला. प्रत्यक्षात या सुरक्षारक्षकांचाच उपद्रव होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षारक्षकांचा त्रास होत आहे. हॉस्टेलच्या तळमजल्यावर असणाऱ्या स्वच्छतागृहांचा वापर हे सुरक्षारक्षक करतात. अनेकदा घाण तशीच ठेवून हे सुरक्षारक्षक निघून जातात. सकाळच्या वेळी डॉक्टरांना राउंड अथवा बाह्यरुग्ण विभागात जाण्याची घाई असते. पण त्या वेळी खासगी सुरक्षारक्षक स्वच्छतागृहांचा अधिक वेळ वापर करतात. त्यामुळे डॉक्टरांचा खोळंबा होतो. डॉक्टरांचे कपडे आणि अन्य किरकोळ वस्तू चोरीला जात आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली आहे. हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक ठेवा, अशीही मागणी केली आहे. पण त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नसल्याचे केईएममधील सूत्रांनी सांगितले.त्यामुळे या सर्व प्रकारांना कंटाळून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासानाला हा सगळा प्रकार लक्षात यावा, म्हणून लेखी तक्रार केली आहे. तक्रार दोन आठवड्यांपूर्वी डिसपॅचला टाकण्यात आली आहे. पण अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. पण सुरक्षारक्षकांसंदर्भात तक्रार असल्यास सुरक्षा विभागाला कळवण्यात येईल. आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)