मुंबई : सचिन वाझे हा बनावट आधारकार्डद्वारे ट्रायडेंट हॉटेलसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर येताच, हॉटेलच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी ट्रायडेंट हॉटेललाही लक्ष्य केले होते. ट्रायडेंटसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये केवळ ओळखीच्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून हॉटेलमध्ये १०० दिवसांसाठी रूम बुक होते. या रूममध्ये राहण्यासाठी येणाऱ्या संबंधित व्यक्तीबाबत अधिक शहानिशा करणे गरजेचे असतानाही हॉटेल प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, ही चिंतेची बाब असल्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भविष्यात एखादा अतिरेकीही अशाप्रकारे बनावट आधारकार्डद्वारे येथे वास्तव्य करू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलीस अधिकारी असूनही वाझे हा सुशांत सदाशिव खामकर या नावाच्या आधारकार्डवर येथे वास्तव्यास होता. आधारकार्डवरील फक्त फोटोच वाझेचा होता. किमान त्या आधारकार्डवरील क्रमांकाची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यामुळे नेहमीच्या ग्राहकांच्या ओळखीवर कुणालाही रूम देणे भविष्यात महागात पडू शकते, असे तपास यंत्रणा आणि पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.