निवडणुका होईपर्यंत खाली पाहा - जे.पी. नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:48 AM2019-07-22T02:48:10+5:302019-07-22T02:48:29+5:30

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधी देशात सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढली.

See below till elections - J.P. Nadda | निवडणुका होईपर्यंत खाली पाहा - जे.पी. नड्डा

निवडणुका होईपर्यंत खाली पाहा - जे.पी. नड्डा

Next

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासवादाचे राजकारण रूजविले आहे. व्होटबँकेच्या ऐवजी कामाची, सेवेची संस्कृती आणली. हीच संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यामुळे देश, राज्य आदी विषयांची चर्चा करताना स्थानिक पातळी प्रभाव वाढविणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुका होईपर्यंत वरची चिंता सोडा, खाली बघा, आपल्या क्षेत्रात काम करा, असे आवाहन भाजपने नवनियुक्त कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गोरेगावर येथील कार्यकारणीच्या बैठकीत केली.

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधी देशात सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढली. आपण विकासाच्या विविध कामांच्या आकडेवारीच्या आधारे आणि वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सांगत आहोत की, ‘देश बदल चुका है’ आणि ‘अच्छे दिन आये है’. हा बदललेला भारत आहे, हे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले पाहिजे. काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, म्हणजे भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा आहे.

भाजपयुक्त भारत करायचा आहे, म्हणजे सेवायुक्त भारत करायचा आहे. २०१९च्या निवडणुकीत लोकांनी मतपेढीचे राजकारण नाकारले असून विकासाचे राजकारण स्वीकारले आहे. ही नवी राजकीय संस्कृती घेऊन भाजप पुढे जात आहे, असे नड्डा म्हणाले. भाजप यशस्वी झाला असला तरी आपल्याला अजून यशाचे शिखर गाठायचे आहे. गेल्या वेळी सदस्यता अभियानात ११ कोटी भाजपा सदस्य झाले होते.यावेळी त्यापेक्षा अधिक सदस्य करायचे आहेत. कोणताही समुदाय आपल्यापासून दूर राहता कामा नये. आपल्याला सर्वांना जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर लक्ष देऊन काम करावे. भाजपाच्या खासदार, आमदारांनी प्रत्येकाने पक्षाच्या विस्तारासाठी सात दिवस पूर्ण वेळ काम करायचे आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

सरोज यांचा मात्र स्वबळाचा नारा
भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी मात्र आपल्या भाषणात स्वबळाचा नारा दिला. त्यांच्या भाषणापुर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा युती म्हणून लढू, भाजपसह मित्रपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी तयारी लागा, २२० जागा जिंकायचे असल्याचे आपल्या भाषणात म्हटले. त्यांच्यानंतर बोलायला उभ्या राहिलेल्या पांडे यांनी मात्र आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि सर्वच्या सर्व २८८ जागांवर विजय मिळविण्यासाठी तयारी करायचे आवाहन केले. त्यांच्या या विधानामुळे ‘एकला चलो रे’चा निर्णय होणार का, अशी चर्चा बैठकस्थळी सुरू होती.

Web Title: See below till elections - J.P. Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.