रेल्वेची नव्हे , प्रवाशांची सोय आधी पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:15 AM2018-09-27T07:15:38+5:302018-09-27T07:16:02+5:30
रत्नागिरीहून मुंबईला येणारी गाडी पुढे मडगावपर्यंत जात असल्याने, ती सिंधुदुर्गातूनच भरून आली आणि प्रवाशांचा पारा चढल्याची घटना गणेशोत्सवात घडली.
रत्नागिरीहून मुंबईला येणारी गाडी पुढे मडगावपर्यंत जात असल्याने, ती सिंधुदुर्गातूनच भरून आली आणि प्रवाशांचा पारा चढल्याची घटना गणेशोत्सवात घडली. यातून एका गाडीचा अधिकाधिक वापर करून नफा कमाविण्याच्या रेल्वेच्या वृत्तीचा फटका प्रवाशांना बसतो, हे पुन्हा दिसून आले. हाच प्रकार
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसबाबत घडतो. साईनगर-शिर्डी एक्स्प्रेसला पंढरपूरचे डबे, तर अमृतसर एक्स्प्रेसला धुळ्याचे
डबे जोडले जातात. यात रेल्वेची सोय होते, पण प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे रेल्वेने स्वत:ची सोय पाहण्यापेक्षा प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर व्यक्त केली. त्यातील काही निवडक प्रतिक्रियांचा धांडोळा...
संपूर्ण प्रवासाचे रेल्वेने तिकीट द्यावे!
इंद्रायणी एक्स्प्रेसला मुंबईहून सोलापूर आणि सोलापूरहून मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, परंतु गाडीचा प्रवास पुणे येथे रेल्वे प्रशासनाकडून खंडित समजला जात असल्याने, आरक्षण पुण्यापर्यंत खंडित होते. याचा त्रास प्रवाशांना होतो, विशेषत: महिला, लहान मुले वयोवृद्ध प्रवासी यांना जास्त त्रास होतो. इंद्रायणी एक्स्प्रेसचे आरक्षण खंडित स्वरूपात न देता, मुंबई ते सोलापूर आणि सोलापूर ते मुंबई असे मिळावे, याचा रेल्वेला अधिक फायदाच हवा असल्यास तिकिटाचे दर वाढविले तरी चालतील. - गणेश बाकशेट्टी
द्वितीय श्रेणी डब्यांची संख्या वाढवा
द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणाºया प्रवाशांच्या तुलनेत डब्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात या डब्यांमध्ये तोबा गर्दी होत असते. रेल्वे प्रशासनाने या स्थितीकडे लक्ष देऊन अनारक्षित (व्दितीय श्रेणी) डब्यांची संख्या वाढवायला हवी.
- तुषार मांडवकर, सांताक्रुझ.
प्रवाशांचे हाल थांबवा!
रेल्वेकडून एकाच एक्स्प्रेसचा वापर विस्तारित यात्रेसाठी केला जातो. यामुळे रेल्वेची सोय होते, पण सर्वसामान्य प्रवाशाला यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशाचे हाल थांबले पाहिजेत.
- दिलीप साळकर, नालासोपारा.
नियोजनात बदल करावा
गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाºया गाड्यांचे नियोजन बिघडलेले दिसून येते. रत्नागिरीहून मुंबईकडे येणारी गाडी यंदा गणेशोत्सवासाठी मडगावपर्यंत चालविल्याने ती गाडी सिंधुदुर्गातूनच भरून आली. त्यामुळे रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. गाडी रत्नागिरी स्थानकात पोहोचली, तेव्हा केवळ दरवाजातून पुढे जाण्यासही जागा नव्हती. केवळ १० ते १२ प्रवासी कसेबसे आत चढले. इतर प्रवाशांना मात्र खासगी बस किंवा पुढच्या गाडीची वाट पाहत थांबावे लागले. रेल्वे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. दररोजच्या गाडीवर अधिभार टाकण्याऐवजी जादा गाड्या चालवाव्यात, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही. - श्वेता शिंदे-जाधव, बोरीवली.
प्रवाशांच्या सोयीचा विचार करा!
रेल्वेचे जाळे भारतभर विणले गेलेले असले, तरी अजूनही बºयाच भागात रेल्वे पोहोचलेली नाही. रेल्वे ही जनतेला सेवा देण्यासाठी आहे, हा उद्देश मागे पडला आहे. सध्या केवळ नफेखोरीच्या दृष्टीकोनातून सरकार रेल्वेकडे पाहू लागली आहे. सर्वसामान्यांना परवडतील, अशा अनेक मार्गांवरील पॅसेंजर गाड्यांची संख्या कमी करून, मेल-एक्स्प्रेस गाड्या वाढविण्याकडे रेल्वेचा कल असतो. पूर्वी असलेले पहिल्या वर्गाचे रेक जवळपास बंदच झाले. वातानुकूलित द्वितीय आणि प्रथम दर्जाच्या बोगी जोडल्या जात आहेत. अनेक गाड्यांचा प्रवास संपला की, तोच रेक परत दुसºया मार्गावर मार्गस्थ केला जातो. त्यामुळे आधीच प्रवासी जागा अडवून बसलेले असतात, हा नेहमीचाच अनुभव येऊ लागला आहे. अनेक गाड्यांना, अन्य मार्गावरचे डबे जोडले जातात. धुळ्याला जाण्यासाठी थेट सेवा शक्य आहे, पण अमृतसर एक्स्प्रेसला डबे जोडून ते चाळीसगाव येथे वेगळे केले जातात. गर्दीच्या दिवसात तर याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गाडीची वाहन क्षमता लक्षात न घेता तिकिटे विकली जातात ते वेगळेच. तेव्हा अशी खंडित सेवा सुरू करताना प्रवाशांच्या सोईचादेखील विचार व्हायलाच हवा.
- अनंत बोरसे, शहापूर.
विशेष डबे जोडा!
रत्नागिरीपुढे सिंधुदुर्ग, गोव्याच्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, रेल्वेने रत्नागिरीपर्यंत असणाºया प्रवासी लोकांकरिता विशेष डबे जोडावेत व ते रत्नागिरीत बाजूला करावे, तसेच सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी याच पद्धतीने परतीच्या प्रवासात परत डबे जोडल्यास, तेथून येणाºया प्रवाशांना सोयीचे होईल. तेथे अतिक्रमण होणार नाही.
- प्रभाकर राजपुरे.
प्रवाशांचे हाल रोखण्यास ‘सप्तपदी’ हवी!
रेल्वेकडून सोयीसाठी एखाद्या
एक्स्प्रेसची विस्तारित यात्रा केली जाते.
याचा प्रत्यय रत्नागिरी, सोलापूर, पंढरपूर आणि शिर्डीला जाणाºया प्रवाशांना येतो. यात रेल्वेची सोय होते, पण प्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी खालील सात उपायांचा अवलंब केल्यास प्रवाशांचे हाल कमी होण्यास मदत होईल.
1एक्स्प्रेसने जाणाºया प्रवाशी संख्येनुसार किंवा आरक्षणानुसार गाड्यांची व्यवस्था करणे व तिकिटावर तशी संगणकीकृत नोंद करण्यासाठी व्यवस्था असावी.
2एक्स्प्रेसचा कारभार पाहणारा जो जबाबदार अधिकारी असेल, त्याचा मोबाइल क्रमांक, व्हॉट्स अॅप क्रमांक, ई-मेल तिकिटाच्या मागे छापण्यासाठी, तसेच रेल्वे डब्यात प्रदर्शित करण्यासाठी दक्ष प्रवासी संघटनेने किंवा दक्ष प्रवाशांनी आग्रह धरावा.
3एक्स्प्रेस व रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने प्रथम ‘प्रवासी
समस्या संशोधन समिती’ नेमून उपाय योजणे आवश्यक आहे.
4भारतातील रेल्वे प्रशासनाने वाढत्या लोकसंख्येचा व भविष्यकाळाचा विचार रेल्वे रूळ वाढवावेत.
5रेल्वे लाइनच्या दुतर्फा म्हणजेच पूर्व-पश्चिम दिशेला रेल्वेला समांतर असे महामार्ग तयार केले पाहिजेत.
6रेल्वेवरून स्कायबससेवा किंवा केबल
बससेवा सरकारने चालू केली पाहिजे.
7भारतात जेथे-जेथे कोणतीही सार्वजनिक वाहतूकसेवा चालू करण्यासाठी सरकारला विरोध होत असेल, तेथे-तेथे भुयारी वाहतूकसेवा चालू करावी, परंतु भूगर्भ शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे अतिआवश्यक आहे.
- गणेश पद्माकर पाटील, ठाणे.