बीडीडी प्रकल्पातील घरे पाहा, कधी मिळणार? म्हाडा उपाध्यक्षांकडून प्रकल्पाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:36 AM2023-10-14T09:36:49+5:302023-10-14T09:41:44+5:30
वरळी, नायगाव व ना.म. जोशी मार्ग येथे उभारण्यात येत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुमारे ९२ एकर जागेवर उभारण्यात येत आहे.
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पाहणीवेळी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी गुरुवारी या प्रकल्पाची पाहणी करत पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेशही दिले.
रहिवाशांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेविषयी त्यांनी माहिती घेतली. पात्रता निश्चितीच्या कामास वेग येण्याकरिता उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषय तडीस नेण्याकरिता पाठपुरावा करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचवेळी त्यांनी प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या नमुना सदनिकांची पाहणी केली.
९२ एकर जागेवर प्रकल्प
वरळी, नायगाव व ना.म. जोशी मार्ग येथे उभारण्यात येत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुमारे ९२ एकर जागेवर उभारण्यात येत आहे.
मोफत मिळणार घर
रहिवाशांना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे.
- वरळी :
९,६८९ पुनर्वसन सदनिका उभारण्यात येतील. टप्पा क्रमांक १ मध्ये पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील ८ विंगचे काम व इमारत क्रमांक ६ मधील ६ पैकी २ विंगचे काम प्रगतिपथावर आहे.
- नायगाव :
३,३४४ पुनर्वसन सदनिकांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील ८ पुनर्वसन इमारतींपैकी ५ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
- ना. म. जोशी :
२,५६० पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण ७ विंगपैकी ४ विंगच्या बेसमेंटचे काम प्रगतिपथावर आहे.