मुंबई : दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या ८ हजार ०२२ चालक आणि वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यातून सुमारे ४२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र त्यामध्ये महिला उमेदवारांसाठी असलेल्या २ हजार ४०६ जागांसाठी केवळ ९३२ अर्थात दोन जागांसाठी एकहून कमी अर्ज प्राप्त झाला आहे. महिलांचा प्रतिसाद अल्प असला तरी उमेदवार न मिळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या ६८५ जागांसाठी मात्र २ हजार ४०६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी २,४०६ अर्ज दाखल झाल्याचा दावा महामंडळाने केला आहे. तरी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १०० गुणांची ५० प्रश्नांची लेखी परीक्षा रविवारी, २४ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होईल. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारे प्रवेश पत्र व परीक्षा केंद्राची माहिती एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. महामंडळ याबाबतची सूचना उमेदवारांना मोबाइलवर मेसेज व त्यांनी दिलेल्या ई-मेलवर देईल. उमेदवारांना संकेतस्थळावरून प्रवेशपत्र घेऊन ते पडताळणीसाठी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी उपस्थित राहावे लागेल.