"पहा जमतंय का; PM मोदींनी बेळगावात आज मराठी भाषेतून भाषणाची सुरुवात करावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:12 AM2023-02-27T11:12:02+5:302023-02-27T12:17:41+5:30
कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन
मुंबई - कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अलीकडे कर्नाटकात वारंवार दौरे होत आहेत. आज मराठी राजभाषा दिन साजरा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर आहेत. त्यामुळेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना एक आवाहन केलंय. मोदींच्या भाषणाची सुरुवात नेहमीच संबंधित राज्यांच्या मातृभाषेत होत असते. त्यामुळेच, बेळगाव हे महाराष्ट्राचे असून बेळगावात मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करावी, असे आवाहन खासदार राऊत यांनी केलं आहे.
कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. आजचा दिवस राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियातून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या लोकांना शुभेच्छा देत पत्रही लिहिले आहे. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं अशा शुभेच्छा राज यांनी पत्रातून दिल्या आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या बेळगाव दौऱ्याला आजचा दिवस जोडला आहे.
मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 27, 2023
''मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!'', असे ट्विट संजय राऊत यांनी केलंय.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच चिघळल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री अमित शहांना भेटायलाही गेले होते. अखेर, सामंजस्याची भूमिका घेण्याचा सल्ला केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना दिलाय. त्यातच, मोदींच्या दौऱ्यावरुन आता संजय राऊत यांनी मोदींना आवाहन केलंय.