लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे लोकांचा जीव जाणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना करत, उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मॅनहोल्स सुरक्षित करण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत ८ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
पावसाळा तोंडावर आला असताना वांद्रे येथील चार मॅनहोल्स उघडी असल्याचे व अंधेरी येथील मनीषनगर येथील जे.पी. रोडवर केबलसाठी खणण्यात आलेला रस्ता अद्याप नीट न केल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा हवाला देत, ॲड.रुजू ठक्कर पालिकेने उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या आदेशांचे पालन केले नसल्याची बाब बुधवारी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ८४ कोटी रुपये निधी देऊनही मॅनहोल्स उघडी असल्याचा दावा ॲड.रुजू यांनी केला. याची दखल घेत, न्यायालयाने मुंबई पालिकेच्या वकिलांकडे याबाबत विचारणा केली. त्यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी चारही मॅनहोल्स सुरक्षित केल्याची माहिती न्यायालयाला दिली.
‘प्रत्येक विभागातील मॅनहोल्स सुरक्षित केली जातील. त्याची जबाबदारी खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.दिले.