मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी भूपेंद्र पटेल यांनी एकट्यानेच शपथ घेतली. त्यामुळे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि त्यांची खाती भुपेंद्र पटेल यांना ठरवावी लागणार आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून देणे, हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेनं सामनातून टीकेचे बाण चालवले आहेत. आता, शिवसेनेच्या टीकेवर आमदार नितेश राणेंनी ट्विटरवरुन प्रहार केलाय.
शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून हेच गुजरात मॉडेल! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून भाकरी फिरवावीच लागते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण, एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे 'मॉडेल' असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे.
शिवसेनेच्या या टीकेवर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रहार केला आहे. कोरोना कालावधीत मुंबई महापालिका आयुक्त परदेशी यांना तुम्ही का बदलले? असा सवाल राणे यांनी विचारला आहे. तसेच, स्वत:च्या बुडाखाली काय जळते, आधी ते बघा... असेही राणेंनी म्हटले आहे.
शिवसेनेनं मोदींनाही केलं लक्ष्य
विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी 'यालाच' किंवा 'त्यालाच' मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. 'मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही' हाच संदेश मोदी यांनी दिला आहे, असे म्हणत शिवसेनेनं मोदींना आपलं मानणाऱ्या पत्रकारांवर निशाणा साधला आहे.